गेल्या महिन्याभरापासून बीडमधील मौजे गावातील वानरांनी तब्बल २५० रस्त्यावरचे कुत्रे मारले असल्याची बातमी रविवारपासून व्हायरल होत असल्याने हैराण झालेल्या वनविभागाने अखेर या बातमीचा खुलासा केला आहे. माकडांनी कुत्र्याची पिल्ले पळवताना केवळ तीन कुत्र्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले आहे. माकड आणि कुत्र्यांमध्ये टोळीयुद्ध झाल्याच्या बातम्यां खोट्या असल्याचे वनविभागाने सांगितले.
प्रत्यक्षात केवळ तीन वानरांनी गावात उच्छाद मांडला होता. त्यामुळे स्थानिक वनविभागने गावातील प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली. या पाहणीनंतर या तीन वानरांनी कुत्र्याच्या पिल्लांना घेऊन जात इमारतीच्या छतावर ठेवत असल्याचे निरीक्षण वनअधिका-यांनी नोंदवले. मात्र छतावरुन खाली पडत कुत्र्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाला. ही संख्या निश्चितच २५० पर्यंत पोहोचली नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
(हेही वाचा – “खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर प्रकरण सीबीआयला सोपवा”)
नेमकी घटना काय
२९ नोव्हेंबर रोजी बीडमधील मौजे गावातील गावक-यांवर वानरे हल्ला चढवत होती. गावातील कुत्र्यांची पिल्ले वानर घेऊन जात असल्याने गावक-यांना नेमकी घटना समजत नव्हती. कुत्र्यांची पिल्ले वानर झाडावर घेऊन जात आहेत आणि खाली फेकत आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या गावक-यांनी वनविभागाला तक्रार केली. मौजे गावात वनविभागाची टीम पोहोचली असता गावकरीच मुळात वानरांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत असल्याचे दिसून आले. वानरांची संख्या गावात उत्तरोत्तर वाढतच गेली.
माकडे कुत्र्यांच्या पिल्लांकडे का वळली
कुत्र्याच्या अंगावर गोचिड व लिखा हे कीटक माकडांचे तसेच वानरांचे आवडते खाद्य असते. कुत्र्यांना झाडावर घेऊन जाईपर्यंत उचलणे माकडांना शक्य नसते. त्यामुळे वानरांनी कुत्र्यांच्या पिल्लांकडे मुक्काम हलवला. वानर कुत्र्यांच्या पिल्लांना सोबत बाळगत होती, झाडावर घेऊन जात होती व सोबत फिरवत होती.
कुत्र्यांची पिल्ले मरण्यामागील कारण
वानर तीन-चार दिवस कुत्र्यांची पिल्ले आपल्याचसोबत ठेवत असल्याने अन्न पाण्याशिवाय ती कमजोर होत गेली. वानर कित्येकदा गावांमधील उंच इमारतींच्या छतावर सोडून द्यायची. छतावरुन स्वतःची सुटका करण्याच्या धडपडीत कुत्र्यांची पिल्ले जमिनीवर आपटायची आणि त्यातच त्यांचा मृत्यू व्हायचा. वानराने प्रत्यक्षपणे कोणत्याही कुत्र्याच्या पिल्लाला जखम किंवा इजा केलेली नसल्याचे निरीक्षण वनविभागाने नोंदवले.
म्हणून वानरांचा माणसांवर हल्ला
गावक-यांच्या हातात काठी किंवा दगड दिसला की आपल्याला या माणसांपासून धोका असल्याच्या समजूतीपोटी वानरांनी संरक्षणासाठीगावक-यांवरच हल्ला चढवला. वानरांनी आपल्यावर हल्ला चढवल्याने घाबरलेल्या गावक-यांनी वनविभागाला तक्रार केली.
कुत्र्याची पिल्ले पळवणा-या वानराला पकडण्याची तरकीब
शनिवारी नागपूर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. वानरांना जवळ आणण्यासाठी त्यांनी कांदे, शेंगा आणि भाकर देऊ केली. वानर जवळ येत असल्याचे पाहून वनअधिका-यांनी त्यांच्यातला विशिष्ट आवाज काढत जवळ येण्याची साद दिली. मात्र वानरांनी त्यांच्यावरच हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. जवळच पिंज-यात कुत्र्याचे पिल्लू पाहताच त्याला धरण्यासाठी दोन वानर शिरले. त्यात कुत्र्याच्या पिल्लांना पळवून नेणारा वानरही अडकला.
Join Our WhatsApp Community