एसटी संपाचा तिढा कायम! २० डिसेंबरला होणार पुढील सुनावणी

राज्यात सुरु असलेल्या एसटी संपाबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मात्र या सुनावणी दरम्यान त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. या सुनावणीत मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी तयार केलेल्या कमिटीला कामगार संघटनेबरोबर चर्चा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासोबत या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार असल्याचे हायकोर्टाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम असून पुढचा महिनाभर हा संप सुरूच राहणार की काय…अशी शक्यता वर्तविली जात आहे.

(हेही वाचा – एसटी संपावर पवारांसोबत बैठक, अद्याप तोडगा नाहीच!)

दरम्यान, यापूर्वीच कोर्टाकडून संप मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर राज्य सरकारने देखील कोर्टाच्या आदेशावरून समिती गठीत केली आहे. असे असताना देखील एसटी आंदोलक कर्मचारी आपले आंदोलन मागे घेण्यास तयार नाही. यापार्श्वभूमीवर कोर्टाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाने कर्मचारी संघटनेविरोधी अवमान याचिका दाखल केली आहे. यावर कोर्टाने कर्मचारी संघटनेला कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले असताना यावर आपण सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा दावा कर्मचारी संघटनेचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव

दरम्यान, एसटी संपकऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणाले की, एसटी संपात नक्षलवादी चळवळीचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या गोष्टीची तात्काळ दखल घेत, तुम्ही या गोष्टीची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायमूर्तींना सांगितले. एसटी महामंडळाची संपाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील आजच्या सुनावणीदरम्यान अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हा धक्कादायक दावा केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here