देशभरात ‘या’ 10 राज्यांत PFI विरोधात NIA आणि ED ची छापेमारी; 100 हून अधिक लोकांना अटक

दहशतवादविरोधातील मोहिमेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि ईडीने गुरुवारी सकाळी मोठी कारवाई केली. जवळपास 10 राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर तपास यंत्रणांनी छापे टाकल्याचे वृत्त आहे. यादरम्यान 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर कर्नाटक, केरळमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे.

एनआयएने दहशतवादाला आर्थिक मदत करणा-या तसेच, दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी असलेल्या निवासस्थानांची आणि अधिकृत ठिकाणांची झडती घेतल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश, केरळ,आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एनआयएचे छापे सुरूच आहेत. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्ताप्रमाणे, तपास यंत्रणांनी राज्य पोलिसांच्या सहकार्याने सुमारे 10 राज्यांमध्ये 100 हून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

( हेही वाचा: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सिग्नल यंत्रणेत बिघाड )

याशिवाय एनआयएने तामिळनाडूतील कोईम्बतूर, कुड्डालोर, रामनाद, दिंडुगल, थेनी आणि थेनकाशीसह अनेक ठिकाणी पीएफआय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले आहेत. याशिवाय राजधानी चेन्नईतील पीएफआयच्या राज्य मुख्यालयातही झडती सुरू आहे.

नेत्यांच्या घरांवर छापेमारी

पीएफआयच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांच्या घरांवर तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत. यासोबतच यावेळी एजन्सींनी मलप्पुरम जिल्ह्यातील मंजेरी येथील पक्षाचे अध्यक्ष सलाम पराड यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सलाम यांच्यावरील कारवाईविरोधात पक्ष कार्यकर्त्यांची निदर्शने सुरूच आहेत. गुरुवारी मोठ्या संख्येने जमलेल्या कामगारांनी घोषणाबाजी केली.

रविवारीही एनआयएने आंध्र प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये छापे टाकले होते. त्यादरम्यान पीएफआय सदस्यांना चौकशीसाठी नेण्यात आले होते. तपास यंत्रणेने हिंसाचार आणि बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये कारवाई केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here