NIA ची देशभरात मोठी कारवाई! ISIS कनेक्शन प्रकरणी महाराष्ट्रात कोल्हापूर-नांदेडमध्ये छापे

ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित प्रकरणावर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने देशभरात एकूण ६ ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर व नांदेड या भागात सुद्धा छापे टाकण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी रेंदाळमध्ये NIA चा छापा पडल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ४ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा : १५ ऑगस्टपर्यंत DP वर तिरंगा ठेवा! पंतप्रधानांचे मन की बातमध्ये आवाहन)

अनेक शहरांमध्ये छापे

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी देशात 6 राज्यांतील अनेक शहरांमध्ये छापे टाकले आहेत. यामध्ये मध्यप्रदेशातील भोपाळ, रायसेन, गुजरातमधील भडौच, सुरत, नवसारी, अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकल व तुमकुर, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड आणि उत्तर प्रदेशातील देवबंद यांचा समावेश आहे. या कारवाईमध्ये काही कागदपत्र आणि साहित्य हाती लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने २५ जून रोजी सुमोटो भादंवि कलम १५३ अ, १५३ ब सह युएपीए अंतर्गत १८, १८ ब, ३८, ३९ आणि ४० नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचाच भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी रेंदाळमध्ये छाप्यादरम्यान एनआयएने चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. रविवारी पहाटे ४ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.

तसेच उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये एनआयए आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान देवबंद येथून एका संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित तरुण हा मदरशाचा विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून आयसिसच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर आली आहे. आयसीसच्या संपर्कात असलेला हा तरुण एनआयएच्या रडारवर होता. आज एनआयएने छापेमारी करत त्याला ताब्यात घेतले आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांचा संबंध आयसिसशी असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून एनआयएकडून या संदर्भात तपास सुरू होता. त्याचाच भाग म्हणून ही छापेमारी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here