अँटिलिया स्फोटके प्रकरणात पहिला जामीन मंजूर

77

संपूर्ण देशभरात गाजलेल्या अँटिलिया स्फोटके प्रकरणात अटकेत असलेल्या क्रिकेट बुकी नरेश गोर याला विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील हा पहिला जामीन आहे. नरेश गोर याने सचिन वाजे याला मोबाईल सिम कार्ड पुरवल्या प्रकरणी एनआयएने अटक केली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील आलिशान इमारत अँटिलिया जवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्या प्रकरणी तसेच कार मालक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने मुंबई गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाजे, सुनील माने, रियाजुद्दीन काझी, क्रिकेट बुकीं नरेश गोर, निलंबित पोलीस हवालदार शिंदे, चकमकफेम प्रदीप शर्मा सह एकूण १० जणांना प्रकरणात अटक करण्यात आली होती.

हेही वाचा :  रेल्वे प्रवाशांना पुन्हा मिळणार गरमा-गरम जेवणाची मेजवानी! )

या सर्व प्रकरणात प्रत्येकांनी वेगवेगळी भूमिका बजावली असल्याचे समोर आले असून या सर्व प्रकरणाचा मास्टर माईंड बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाजे हा असून त्याच्या सांगण्यावरून क्रिकेट बुकी नरेश गोर याने वाजे याला मोबाईल फोनचे बोगस नावाचे सिम कार्ड पुरवले होते.

या सर्व प्रकरणात या सिम कार्डचाच वापर करण्यात आलेला आहे. मात्र मी केवळ सिम कार्ड पुरवले आहे, बाकी माझा वाजे तसेच मनसुख याच्याशी अथवा इतर आरोपीशी कधी संबध आलेलाच नसल्याचे नरेश गोर याने आपले म्हणने विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला त्यात म्हटले आहे. नरेश गोर यांचे वकील अनिकेत निकम यांनी विशेष न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली. विशेष. न्या. ए.टी. वानखेडे यांनी त्यात नरेश गोर याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. अँटिलिया तसेच मनसुख हिरेन हत्याकांड या प्रकरणात मिळालेला हा पहिलाच जामीन आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.