वाझे कारनाम्यात बाईनंतर आता बाईकची एन्ट्री!

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ही बाईक जरी महिलेच्या नावावर नोंद झालेली असली तरी ती बाईक सचिन वाझे वापरत होता, अशी माहिती समोर येत आहे.

अ‍ॅंटिलिया स्फोटके प्रकरणात महागड्या गाड्यांच्या पाठोपाठ आता एका बाईकची एन्ट्री झाली आहे. एनआयएने या प्रकरणात दमण येथून स्पोर्ट बाईक हस्तगत केली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या बाईकची किंमत ७ लाखांच्या जवळपास आहे. ही बाईक एका महिलेच्या नावावर नोंद असल्याचे समजते. यापूर्वी एनआयएने दमण येथून वोल्वोसह इतर परिसरातून आतापर्यंत ८ महागड्या मोटारी हस्तगत केलेल्या आहेत.

‘कार’नाम्यांनंतर आता बाईक आली

अ‍ॅंटिलिया स्फोटके प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे याच्या चौकशीत दररोज नवीन माहिती समोर येत आहे. एनआयएच्या पथकाने या प्रकरणात ८ महागड्या मोटारी हस्तगत केलेल्या आहेत. यापैकी १ वोल्व्हो कार ही दमण येथून ताब्यात घेण्यात आली होती. दरम्यान एनआयएच्या पथकाने रविवारी दमण येथून एक स्पोर्ट बाईक ताब्यात घेतली आहे.
बेनेली असे या स्पोर्ट बाईकचे नाव असून, ती एका महिलेच्या नावावर नोंद असल्याचे समजते. एमएच-०४ जी एक्स ९६९६ असा या बाईकचा क्रमांक आहे. या बाईकची नोंदणी ठाणे परिवहन विभागात करण्यात आलेली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ही बाईक जरी महिलेच्या नावावर नोंद झालेली असली तरी ती बाईक सचिन वाझे वापरत होता, अशी माहिती समोर येत आहे.

(हेही वाचाः परमवीर सिंग यांच्या आरोपांची चौकशी सीबीआय करणार! )

कोण आहे महिला?

ही महिला सचिन वाझे यांची मैत्रीण असल्याचे बोलले जात असून, मिरा-भायदंर परिसरात राहणारी आहे. या महिलेला मागील आठवड्यात एनआयएने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेऊन तिची १३ ते १४ तास एनआयए कडून चौकशी करण्यात आली होती. तिच्या चौकशीत या बाईकची माहिती एनआयएला मिळाली असल्याचे समजते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here