राष्ट्रीय सुरक्षा पथक आता अंबानी प्रकरणात अधिकाधिक पुरावे जमा करण्याच्या मागे लागले आहे. हाती आलेले पुरावे तपासण्यासाठीही एनआयए सक्रिय झाली आहे. त्यासाठी पुण्यातील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच पथक शुक्रवारी, १९ मार्च रोजी थेट मुंबईतील एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले आहे.
ताब्यात घेतलेल्या गाड्यांची तपासणी सुरु
राष्ट्रीय सुरक्षा पथक हे मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात ताब्यात घेतलेल्या इनोव्हा, स्कॉर्पिओसह मर्सिडीज गाड्यांचीही तपासणी करत आहे. हाताचे ठसे आणि इतर पुरावे मिळतात का, याचीही तपासणी करत आहे. ही तिच इनोव्हा आहे जी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओच्या मागे घटनेच्या दिवशी फिरत होती. ही इनोव्हा पोलीस आयुक्तालयातून वाझेंच्या अटकेनंतर एनआयएने ताब्यात घेतली आहे. फॉरेन्सिक लॅबकडून केल्या जात असलेल्या संपूर्ण तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले जात आहे. इनोव्हानंतर फॉरेन्सिक टीम इतर गाड्यांची तपासणी करणार आहे. अर्ध्या तासापासून तपासणी सुरू होती.
(हेही वाचा : प्रयागराज येथील मशिदींवरील भोंगे सकाळपर्यंत बंद राहणार! पोलीस महानिरीक्षकांचा आदेश )
एनआयए प्रमुखांनी पोलीस आयुक्तांची घेतली भेट
दरम्यान शुक्रवारी, १९ मार्च रोजी सकाळीच एनआयएचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला हे पोलीस आयुक्त कार्यलयात पोहचले होते. त्यांनी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. त्यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद भारंबे हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ते एस. चैतन्य यांना देखील बोलावण्यात आले होते. याप्रसंगी एनआयएचे अधीक्षक विक्रम खलाटे हेही उपस्थित होते.
गृहमंत्री अनिल देशमुखांची दिल्लीत पवारांसोबत चर्चा
गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील शुक्रवारी दिल्ली येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अँटिलिया प्रकरणावर त्यांच्याशी चर्चा करून राज्यसरकार एनआयएला तपासात संपूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती दिली. तपासात जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी शरद पवार यांना सांगितले.
Join Our WhatsApp Communityआदरणीय पवार साहेबांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अँटीलिया प्रकरणाविषयी त्यांच्याशी चर्चा करून राज्यसरकार #NIA ला तपासात संपूर्ण सहकार्य करीत असल्याची माहिती त्यांना दिली. तपासात जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांना सांगितले.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 19, 2021