एनआयएची नवीन चाल, कळवा रेल्वे स्थानकावर ‘सीन रिक्रिएट’!

एनआयएकडून आता सीएसटी रेल्वे स्थानक आणि कळवा रेल्वे स्थानकावरुन मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि सोमवारी रात्री वाझेचे चालताना केलेले चित्रीकरण या दोन्हीतील साम्य तपासण्यात येणार आहे.

140

मनसुख हिरेन याची हत्या करण्यात आली त्या रात्री सचिन वाझे याने सीएसएमटी ते कळवा असा प्रवास ट्रेनने केला. असा संशय एनआयएला असून काही पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. त्यामुळे सोमवारी रात्री एनआयएचे पथक सचिन वाझेला घेऊन कळवा रेल्वे स्थानकावर आले होते. त्यानंतर एनआयएकडून सचिन वाझेला काही पाऊले फलाटावर चालण्यास सांगून, त्याचे चित्रीकरण करण्यात आले. एनआयएकडून आता सीएसटी रेल्वे स्थानक आणि कळवा रेल्वे स्थानकावरुन मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि सोमवारी रात्री वाझेचे चालताना केलेले चित्रीकरण या दोन्हीतील साम्य तपासण्यात येणार आहे.

म्हणून केला सीन रिक्रिएट

मनसुख हिरेन यांची ४ मार्च रोजी हत्या करुन त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकून दिला होता. ५ मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर या ठिकाणी सापडला. मनसुखच्या हत्येच्या वेळी सचिन वाझे स्वतः तिकडे हजर होता असा संशय एनआयएला आहे. त्यासाठी एनआयएकडून ४ मार्च रोजीचे सीएसएमटी ते कळवा दरम्यानचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. एनआयएच्या हाती लागलेल्या फुटेजपैकी सीएसएमटी, कळवा आणि सॅंडहर्स्ट रोड येथील फुटेज मध्ये सचिन वाझे दिसून येत आहे. याबाबतची खात्री करुन घेण्यासाठी सोमवारी रात्री एनआयएचे पथक वाझेला घेऊन कळवा रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ आणि २ वर दाखल झाले होते. सचिन वाझे याला फलाटावर काही पाऊले चालण्यास सांगण्यात आले. एनआयएने त्याचे चित्रीकरण करुन घेतले आहे.

(हेही वाचाः वाझे कारनाम्यात बाईनंतर आता बाईकची एन्ट्री!)

४ मार्च रोजी काय घडले?

अ‍ॅंटिलिया येथे स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक मनसुख हिरेन, याला ४ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास एक फोन आला होता. कांदिवली वरुन तावडे नावाचा अधिकारी बोलत असल्याचे सांगून, मनसुखला घोडबंदर रोड या ठिकाणी बोलावून घेण्यात आले होते. ५ मार्च रोजी मनसुख याचा मृतदेह संशयास्पदरित्या मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला, त्यामुळे एकच खळबळ माजली. ४ मार्च रोजी सायंकाळी मनसुखला विनायक शिंदे आणि सचिन वाझेसह आणखी दोघे जण असे एकूण चार जण भेटले होते, असा संशय एनआयएला आहे.

असा केला वाझेने प्रवास

४ मार्च रोजी सायंकाळी सचिन वाझे हा सीआययुच्या कार्यालयातून बाहेर पडला व त्याने त्याने थेट सीएसएमटी रेल्वे स्थानक गाठले. स्वतःचा फोन बंद करुन, बोगस नावाने मिळवलेले सिम कार्ड असलेला मोबाईल चालू करुन तो विनायक शिंदे आणि इतरांच्या संपर्कात होता. त्यानंतर वाझे याने सायंकाळी ७च्या सुमारास त्याने सीएसएमटी येथून ट्रेन पकडून थेट कळवा गाठले. तेथून सचिन वाझे सोबत विनायक शिंदे आणि इतर दोघे खाजगी गाडीतून मनसुखला भेटायला गेले होते.
काम फत्ते झाल्यानंतर त्याच रात्री सचिन वाझे पुन्हा कळवा रेल्वे स्थानकावर आला व त्याने सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन पकडून सॅंडहर्स्ट रोड गाठले. तेथून डोंगरी पोलिस ठाण्यात बारवरील छापेमारीसाठीची डायरी एन्ट्री त्याने केली होती, असा संशय एनआयएला आहे. या अनुषंगाने एनआयएकडून तपास केला जात आहे.

(हेही वाचाः अंबानी प्रकरण : मुंबई पोलिसाचा ढिसाळपणा, एनआयएची अचूकता! )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.