प्रेमविवाहास विरोध, अद्दल घडवण्यासाठी भाचीनं केलं असं काही…

प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या मामा मामीला अद्दल घडवण्यासाठी भाचीने प्रियकराच्या मदतीने ६ वर्षाच्या मामे भावाचे अपहरण केले. या मामे भावाच्या सुटकेसाठी दहा लाख रुपयांची खंडणीही तिने मागितली. ही धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथून मुलाची सुखरूप सुटका करून भाची आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

असा घडला प्रकार

नवी मुंबईतील खांडेश्वर येथे राहणारे व्यापारी विनय सिंग यांच्या पत्नीच्या फोनवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून २२ नोव्हेंबर रोजी एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने तुमची भाची आणि तुमचा ६ वर्षाचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, त्यांची सुखरूप सुटका करायची असल्यास १० लाख रुपये घेऊन मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक या ठिकाणी या. इतकेच नाही तर जर पोलिसांना कळवले तर दोघांची हत्या करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. धमकीचा फोन आल्यामुळे तक्रारदार यांच्या पत्नीने भाची आणि मुलाचा शोध घेतला मात्र ते दोघे कुठेही दिसून न आल्यामुळे तिने घाबरून पतीला फोन केला व झालेला प्रकार सांगितला.

(हेही वाचा -भाजपाची एसटी आंदोलनातून माघार, कामगार मात्र संपावर ठाम!)

पोलिसांकडून दोघांची वांद्रे येथून सुटका

व्यापारी विनय सिंग यांनी ताबडतोब घरी येऊन खांडेश्वर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी ताबडतोब दोन पथके तयार करून अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला असता सदरचा फोन वांद्रे परिसरातून आला असल्याचे समजताच पोलीस पथक वांद्रे येथे रवाना झाले. दरम्यान फोन करणारी व्यक्ती ही खारदांडा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी खारदांडा येथून एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशीत मुलगा आणि भाची व वांद्रे टर्मिनस या ठिकाणी असल्याचे कळले. पोलिसांनी दोघांची वांद्रे येथून सुटका केली. ताब्यात घेण्यात आलेल्या अपहरणकर्त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. तक्रारदार याची भाची या कटातील मुख्य सूत्रधार असून अटक करण्यात आलेला अपहरणकर्ता हा तिचा प्रियकर आहे.

म्हणून भाचीने रचला हा कट

मामा मामीचा दोघांच्या प्रेमप्रकरणाला आणि लग्नाला विरोध केल्यामुळे या दोघांना अद्दल घडवण्यासाठी तिनेच हा कट रचला होता अशी धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी भाची आणि तिचा प्रियकर या दोघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here