मुंबईत नायजेरियन टोळी ड्रग्ज व्यवसायातून दिवसाला कमवते इतके कोटी…

मुंबईत नायजेरियन ड्रग्ज माफिया दिवसाला कोट्यवधी रुपयांची कमाई करत असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे.

153

मुंबईतील सर्वात मोठे ड्रग्सचे जाळे तयार करणाऱ्या चिंकू पठाण, आरिफ भुजवाला, बटाटा, सुलतान मिर्झा या टोळीला अटक केल्यानंतर, मुंबईत ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी नायजेरियन टोळ्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्या आहेत. या नायजेरियन टोळीपैकी ‘मुसा’ याची टोळी सध्या मोठ्या प्रमाणात मुंबईतील ड्रग्स विक्रेत्यांना ड्रग्सचा पुरवठा करत आहे. दिवसाला ही टोळी २ कोटी रुपयांच्या ड्रग्सची विक्री करत असल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे. याबाबतची माहिती एनसीबीचे मुंबई विभाग संचालक समीर वानखेडे यांनी सांगितले.

एनसीबीच्या अधिका-यांवर हल्ला

आम्ही मुसा आणि त्याच्या टोळीला पकडण्यासाठी गेलो असता, या टोळीने आमच्यावर धारदार शस्त्राने, दगडाने हल्ला करुन तिथून पळ काढला. मात्र, आमच्या अधिकाऱ्यांनी जखमी अवस्थेत देखील या टोळीतील मुसा याच्या अंगरक्षकाला अटक करुन त्याच्याजवळून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले असल्याचे वानखेडे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले. या टोळीचा म्होरक्या मुसा देखील कारवाईच्या वेळी त्या ठिकाणी हजर होता, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.

(हेही वाचाः नायजेरियनकडून एनसीबी अधिकाऱ्यांवर पुन्हा हल्ला! ५ अधिकारी जखमी )

अशी आहे मुसाची गँग 

मुसा सध्या मुंबईत एकमेव ड्रग्स विक्रेता असून, त्याच्या टोळीत १५ ते १६ नायजेरियन आहेत. आफ्रिकन नागरिक असलेला मुसा हा मागील काही वर्षांपासून मुंबईत ड्रग्सचा व्यापार करत आहे. मुसाचा व्हिसा अनेक वर्षांपूर्वी संपला असल्याने, तो भारतात बेकायदेशीरपणे राहत आहे आणि त्याने वाशी, घणसोली आणि उळवे भागांत आपले सुरक्षित आश्रयस्थान बनवले आहे. त्याने आपल्या टोळीत तायक्वांदो प्रशिक्षित, तलवार चालवणारे अंगरक्षक अशा व्यक्तींना घेतले असून, त्यांच्यामार्फत तो आपली टोळी चालवत आहे. मुंबईतील छोट्या मोठ्या ड्रग्स विक्रेत्यांना कोकेन, हेरॉईन, एमडी यांसारख्या मादक पदार्थांचा पुरवठा तो करत आहे.

दिवसाला २ कोटींच्या ड्रग्सची विक्री

एनसीबीने मागील काही महिन्यांत मुंबईतील अंमली पदार्थांचे व्यापारी चिंकू पठाण, आरिफ भुजवाला, बटाटा, सुलतान मिर्झा या टोळीचे साम्राज्य नष्ट करुन, त्यांना अटक केली. त्यानंतर मुंबईत ड्रग्स विक्रेत्यांना ड्रग्स मिळत नसल्यामुळे एक पोकळी तयार झाली होती. मुसा या नायजेरियन टोळीने ही पोकळी भरुन काढली. मुंबईतील छोट्या-मोठ्या ड्रग्स विक्रेत्यांना तो ड्रग्सचा पुरवठा करत होता. मुसाचे थेट कोलंबियातील ड्रग्स व्यापाऱ्यांशी संबंध असून, त्यांच्याकडून ड्रग्स खरेदी करत, ते आफ्रिकेमार्फत मुंबईत आणून त्याची विक्री केली जात होती. मुसाची टोळी मुंबईत दिवसाला २ कोटी रुपयांच्या ड्रग्सची विक्री करत असल्याचे, अटक करण्यात आलेल्या त्याच्या अंगरक्षकांच्या तपासात समोर आले आहे, अशी माहिती वानखेडे यांनी दिली.

(हेही वाचाः फेरीवाल्यांकडून हप्तावसुली करुन टोळी झाली मालामाल! काय झाले पुढे?)

असा करतो धंदा

मुसा हा मानखुर्द आणि वाशी दरम्यान असलेल्या तिवरांच्या जंगलातून चालतो. मुसा आणि त्याच्या माणसांनी तस्करांमध्ये दहशत निर्माण केली आहे, ड्रग्स खरेदी करताना त्याच्याशी कुठलाही तस्कर त्याला विरोध करण्याची हिंमत करत नाहीत. मुसाकडे ड्रग्स घेण्यासाठी येणाऱ्या छोट्या तस्करांना मुसापर्यंत पोहचण्यापूर्वी त्याची माणसे त्या तस्कराचा फोटो काढून, त्यानंतर त्याला मुसाकडे घेऊन जात. मुसा हा ड्रग्सचा सौदा करण्यापूर्वी त्याची पिस्तूल बाहेर काढतो आणि ड्रग्स घेण्यासाठी येणाऱ्या तस्करांसमोर ठेवतो. त्यामुळे त्याच्यासमोर कुठलाही ड्रग्स तस्कर वाद न घालता मुकाट्याने पैसे देऊन आपला माल घेऊन जातो, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

एनसीबीला आले यश

विमानतळावरुन नुकतीच अटक करण्यात आलेला मोझाम्बिक नागरिक इमॅन्युएल झेडेक्विअस याच्या पोटातून कोकेनने भरलेल्या ७० कॅप्सूल जप्त करण्यात आलेल्या होत्या. चौकशीत इमॅन्युएल झेडेक्विअस हा मुसा याच्यासाठी ड्रग्स तस्करी करत असल्याचे समोर आल्याचे, समीर वानखेडे यांनी हिन्दुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. त्यानंतर मुसाच्या टोळीची माहिती एनसीबीला मिळाली होती व त्यानंतर एनसीबीने मानखुर्द येथे कारवाई केली. त्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर या टोळीने हल्ला केला. त्यात पाच अधिकारी जखमी झाले होते. मुसा आणि त्याची टोळी त्यावेळी पळून गेली. मात्र त्याच्या अंगरक्षाला अटक करण्यात एनसीबीला यश आले.

(हेही वाचाः ‘स्फुफिंग सॉफ्टवेअर’च्या सहाय्याने ‘सिल्वर ओक’चा नंबर करण्यात आला होता हॅक!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.