इलेक्ट्रिक वाहन घ्यायचं तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार, कारण…

आता स्वस्त इलेक्ट्रिक कार येणार, इंधन वाहनांपेक्षा असणार कमी किंमत, गडकरींनी केला दावा

132

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत तेजी आहे, परंतु त्याच्या किमती अधिक असल्याने त्याच्या विक्रीत अडथळा ठरत आहेत. किमतीच्या आघाडीवर काम केले जात असून आगामी काळात त्यात घट होईल, असे सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते. दरम्यान इलेक्ट्रिक वाहने घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खुशखबर दिली आहे. येत्या केवळ दोन वर्षांत पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक वाहने बाजारात दाखल केली जातील. यासाठी त्यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इंधन वाहनांपेक्षा असणार कमी किंमत

पुढे गडकरींनी असेही सांगितले की, तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेतील जलद प्रगतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होतील आणि पुढील दोन वर्षांत ही वाहने पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीने किंवा त्याहूनही कमी किमतीत असतील. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्याने त्याचा विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. याला सामोरे जाण्यासाठी सरकार खरेदीवर अनेक सवलती देत आहे.

इलेक्ट्रिक वाहनावर फक्त १० रुपये खर्च

  • हायड्रोजन हा लवकरच सर्वांत स्वस्त इंधन पर्याय असेल. जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कालावधीत इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटोरिक्षाची किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर, कार, ऑटोरिक्षा यांच्यासारखीच असेल. लिथियम-आयन बॅटरीच्या किमती कमी होत आहेत.
  • आम्ही झिंक-आयन, ॲल्युमिनियम-आयन, सोडियम-आयन बॅटरीसाठी तंत्रज्ञान विकसित करत आहोत. जर तुम्ही पेट्रोलवर १०० रुपये खर्च करत असाल, तर त्याच वापरासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनावर १० रुपये खर्च करावे लागतील

(हेही वाचा – तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन आहे? मग नो टेन्शन! जाणून घ्या कारण)

१६ महामार्गावर १५७६ चार्जिंग स्टेशन

इलेक्ट्रिक वाहनांबाबत सरकारची मोठी योजना आहे. अवजड उद्योग राज्यमंत्र्यांनी संसदेत माहिती दिली की, फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत अवजड उद्योग मंत्रालयाने देशातील १६ महामार्ग आणि ९ द्रुतगती मार्गांसाठी १५७६ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मंजूर केले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूला २५ किमी अंतराने किमान एक चार्जिंग स्टेशन बसविण्यात येईल, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. याशिवाय महामार्गाच्या दोन्ही बाजूला १०० किमी अंतराने लांब पल्ल्याची हेवी ड्युटी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

३ चौरस किमीवर किमान एक चार्जिंग केंद्र

केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर २५ किलोमीटरवर किमान एक चार्जिंग केंद्र आणि लांब पल्ल्याच्या किंवा अधिक अवजड प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना दर १०० किलोमीटरवर किमान एक चार्जिंग केंद्र उभारले जाईल. कोणत्याही शहरात ३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर किमान एक चार्जिंग केंद्र असणे अपेक्षित आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.