अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी त्यांच्या किर्तनातून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे इंदुरीकरांचा पुन्हा एकदा तोल सुटला असून हे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे.
‘हे’ आहे वादग्रस्त वक्तव्य
अकोल्यात सोमवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाजारांच्या किर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर निशाणा साधला आहे. इंदुरीकर महाराजांनी या किर्तनादरम्यान अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या किर्तनाचे व्हिडीओ पोस्ट करुन हे लोक कोट्याधीश झाले असा टोला लगावला आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश झालेत, त्यांच्यामुळेच आपण अडचणीत आलो असून अशा लोकांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असे वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले आहे. अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केले होते.
(हेही वाचा – ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी)
आधीही अनेक वादग्रस्त केली वक्तव्ये
त्यांचे किर्तनादरम्यान व्हिडिओ काढणाऱ्यांना त्यांनी अनेकदा हटकले. व्हिडिओ काढू नका असे त्यांनी अनेकदा सांगितले. संपूर्ण किर्तनामध्ये त्यांचा युट्यूबवर्सवरील संताप दिसून आला. आपल्या कीर्तनातून यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांवर घसरणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी या आधीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. अपत्य जन्माच्या बाबतील त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते त्यांच्या अंगाशी आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २०२० साली एका किर्तनामध्ये त्यांनी सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते. त्यानंतर त्यांचे हे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणात त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेली. याचप्रमाणे इंदुरीकर महाराजांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात नाशिकमधील घोटी येथील कार्यक्रमादरम्यान कोरोना संदर्भात वक्तव्य करताना आपण लस घेतली नाही आणि घेणार ही नाही असे म्हटले होते.