पब, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचणीशिवाय नो एन्ट्री!

मुंबईत मॉल्स, पब आदींसाठी कडक निर्बंध लागू करूनही तिथे नियमांचे पालन होत नसल्याने आता मॉल्स, पब, शॉपिंग सेंटर, लांब पल्ल्याची रेल्वे स्थानक, एस.टीची बस स्थानके आदी ठिकाणी अँटीजेनच्या माध्यमातून कोरोनाच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या ४०० ते ५०० वाढली गेली असून गुरुवारी रुग्णांची संख्या तब्बल २,८७७ एवढी आढळून आली. मुंबईतील वाढणाऱ्या या रुग्ण संख्येमुळे महापालिका आयुक्तांनी मुंबई महापालिकेच्या यंत्रणांना चाचणी आणि लसीकरण वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. याबरोबरच आता वाढत्या गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी मॉल्स, पब, शॉपिंग सेंटर, सिनेमागृह, रेल्वे स्थानके तसेच बस स्थानके आदी ठिकाणी रॅपिड टेस्टच्या माध्यमातून प्रत्येकाची चाचणी करूनच प्रवेश दिला जावा, असेही निर्देश आयुक्तांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

अधिकाधिक कोरोनाच्या चाचण्या तसेच लसीकरणावरही भर देण्याचे निर्देश!

मुंबईत बुधवारी २,३७७ रुग्ण आढळून आले होते, तर गुरुवारी २,८७७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे झपाट्याने वाढत असलेली रुग्ण संख्या तसेच कोविडच्या लसीकरणाबाबत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त तसेच आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी, अधिष्ठाता आदींची एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये आयुक्तांनी मुंबईतील कोरोनाच्या आजाराचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी त्यावर नियंत्रणा मिळवण्यासाठी अधिकाधिक कोरोनाच्या चाचण्या तसेच लसीकरणावरही भर देण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा : २१० कोटी रुपये थकविणाऱ्या विकासकांना महापालिकेचा दणका!)

सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक!

मुंबईत मॉल्स, पब आदींसाठी कडक निर्बंध लागू करूनही तिथे नियमांचे पालन होत नसल्याने आता मॉल्स, पब, शॉपिंग सेंटर, लांब पल्ल्याची रेल्वे स्थानक, एस.टीची बस स्थानके आदी ठिकाणी अँटीजेनच्या माध्यमातून कोरोनाच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्याचेही निर्देश दिले आहे. या रॅपिड टेस्टमुळे कोरोना बाधित रुग्ण शोधणे सोपे जाईल. सध्या लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने अशाप्रकारच्या चाचण्या केल्याशिवाय मॉल्स तसेच पबसह रेल्वे स्थानके व बस स्थानकांमध्ये प्रवेश दिला जावू नये, असे निर्देश देत याची त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागासह विभाग कार्यालयांना दिल्याची माहिती मिळत आहे. याबाबत लवकरच परिपत्रक जारी करून संबंधितांना सूचना दिल्या जाणार आहेत.

गुरुवारी ३९,६४४ जणांचे लसीकरण!

तसेच लसीकरणाची संख्याही अधिकाधिक वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी  दिले आहे. गुरुवारी महापालिका, राज्य व केंद्र सरकारी रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयांमध्ये ३९,६४४ जणांच्या लसीकरणाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांसह केंद्रांमध्ये २४,६३६ लसीकरण, तर राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये २,४९१ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १२,५१२ जणांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे या लसीकरणाची संख्या अधिक वाढवण्याच्यादृष्टीकोनातून पाऊल उचलण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here