ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पात वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे (अंदाजे वय ३०) यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणानंतर वनक्षेत्रातील महिला कर्मचा-यांच्या शारीरिक क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आणि राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे यांनी वन्यजीव क्षेत्रात महिला कर्मचा-यांचे वय ४० पेक्षा जास्त नसावे, अशी अजब मागणी केली आहे.
ढुमणेंकडे पुरेसं प्रशिक्षण होतं का?
२० नोव्हेंबर रोजी ताडोबातील कोलारा या अतिसंरक्षित क्षेत्रात व्याघ्र गणनेसाठी ट्रान्सीट लाईनंच काम करताना स्वाती ढुमणे यांच्यावर वाघीणीचा हल्ला झाला. हल्ल्याच्यावेळी तीन वनमजूरही ढुमणेंसह जंगलात होते. तीन वनमजूर पुढे चालत असताना पाठी राहिलेल्या स्वाती ढुमणेंवर हल्ला झाल्याच्या घटनेवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. प्रादेशिक वनविभागातून त्यांची बदली ताडोबात झाली होती, त्यामुळे वन्यजींवासोबत विशेषतः वाघांचा संचार असलेल्या जंगलात काम करण्याचं पुरेसं प्रशिक्षण स्वाती ढुमणे यांच्याकडे होतं का, असा मुद्दा उपस्थित करताना वनविभागातील संघटना ढुमणे या केवळ महिला वनाधिकारी असल्यावरच बोट ठेवत आहे. वयोमानानंतर वाघाचा हल्ला झाला तर पुरुषांच्या तुलनेत महिलांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर चढता येत नाही, असा मुद्दा वनविभागातील विविध संघटना उपस्थित करत आहेत. पुरुष वनाधिका-यांच्या तुलनेत महिला वनाधिका-यांची चपळाईता वयोमानाने कमी होते, असेही सांगण्यात येत आहे.
( हेही वाचा : प्राथमिक शाळा सुरु करण्यावर काय म्हणाले आरोग्यमंत्री? वाचा… )
महिला वनाधिका-यांचा विरोध
वनविभागात कार्यरत असणा-या महिला वनाधिका-यांनी या मागणीला जोरदार विरोध केला आहे. केवळ महिला म्हणून जंगल क्षेत्रात काम करताना बंधन लादणं चुकीचं असल्याचं महिला वनाधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगत आहेत. ही, मागणी स्त्री-पुरुष असमानतेचा पुरस्कार करणारी आहे. पुरुष असो वा स्त्री सर्वांनी पुरेसं प्रशिक्षण मिळाल्यानंतर वन्यजीव क्षेत्रात काम करायला हवं. वन्यजीव हल्ला करताना पुरुष आणि स्त्री असा मतभेद करत नाही. मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे यांच्या मागणीबाबत अधिकृतरित्या वनविभागाच्या वरिष्ठांजवळ आम्ही आमची मते मांडली आहेत, असेही महिला वनाधिकारी म्हणाल्या. तर, वन्यजीव क्षेत्रात महिला कर्मचा-यांचं वय ४० च्यापुढे नसावं या मागणीबाबत आम्ही महिला वनाधिका-यांच्या प्रतिक्रिया मागवल्या आहेत, त्यानंतर या मागणीबाबत पुढील चर्चा होईल. असे, महाराष्ट्र राज्य वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहेत शारीरिक क्षमतेसंदर्भातील मागण्या?
– वन्यजीव क्षेत्रात कार्य करणा-या महिला कर्मचा-याचे वय ४० पेक्षा जास्त नसावे
– महिला वनरक्षक, शारीरिक क्षमता कमी असलेले किंवा वयाने जास्त असलेल्या वनरक्षकांना क्लर्क व अकाऊंट या विभागात सामावून घ्यावे.