यापुढे कुठल्याही पोलिस अधिकाऱ्यांकडून चुका झाल्यास त्या अधिकाऱ्याला माफ करण्यात येणार नसल्याचा इशारा मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिला आहे. यापुढे छोटीशी चूक देखील खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी या बैठकीत म्हटले आहे. पोलिस आयुक्त लवकरच वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बैठक घेणार असून, असाच इशारा या बैठकीत देखील देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
बैठक घेत दिला इशारा
मुंबई पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर हेमंत नगराळे यांनी गुरुवारी सहपोलिस आयुक्त, अप्पर पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आयुक्तांनी मुंबई पोलिस दलातील कामाचा आढावा घेत, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत घडणा-या गुन्ह्यांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. तसेच या पुढे मुंबई पोलिस दलाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी चुका केल्यास त्याला माफ केले जाणार नाही, त्या अधिकाऱ्याला त्याच्या चुकीची शिक्षा देण्यात येईल, असा इशारा देखील नगराळे यांनी दिला आहे.
(हेही वाचाः मुंबई पोलिस दलात होणार मोठे फेरबदल, सीआययुचे पंख छाटणार?)
वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची घेणार बैठक
मुंबईतील स्ट्रीट क्राईम, क्राईम रेट कमी करण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा. पोलिस दलाकडून छोटीसी चूक सुद्धा सहन केली जाणार नसल्याचे नगराळे यांनी बैठकीत सांगितले. मुंबईतील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची लवकरच बैठक पार पडणार आहे.
Join Our WhatsApp Community