सरकारी रुग्णालयांवरील वाढत्या रुग्णसंख्येचा भार लक्षात घेत राज्यभरात रुग्णसेवा देताना २५ हजार परिचारिकांची उणीव आहे. रुग्णसंख्या वाढत आहे, परंतु परिचारिकांना कायमस्वरुपी नियुक्त न करता तिच्या करिअरशी आणि रुग्णसेवेशी सरकारने सुरु केलेली हेळसांड कधी थांबणार? असा संतप्त सवाल विचारत सोमवारी आझाद मैदानात राज्यभरातून परिचारिका आपल्या मागण्यांसाठी आक्रोश पुकारणार आहेत. कोरोनाकाळानंतर परिचारिकांचे प्रश्न पुन्हा पूर्वपदावर येताच सरकारने बेईमानी केल्याचा संताप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केली विनंती
मनुष्यबळाची कमतरता, कामाचा वाढता ताण या समस्यांमुळे परिचारिकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. सतत उभे राहिल्याने पायाच्या मागच्या बाजूच्या रक्ताच्या नसा दिसणे, संधिवात, सांधेदुखी, गुडघ्यांमध्ये अंतर निर्माण होणे या समस्या आता प्रकर्षाने जाणवत आहेत. सर्वच सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यांमधील परिचारिकांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रासले आहे. त्यातच २०१७ सालापासून परिचारिकांची नियुक्ती थांबल्याने, जवळपास सर्वच सरकारी रुग्णालयांत आणि दवाखान्यांत परिचारिकांवर ताण निर्माण होत आहे. यावर तीळमात्र उपाय नको, कंत्राटी पद्धतीने नेमणूका केल्यास रुग्णसेवा खंडीत झाल्यास संबंधितांना जबाबदार धरता येणार नाही, ही रुग्णसेवेच्या दृष्टीकोनातून निर्माण होणारी समस्या वेळीच आवरा, अशी विनंती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केली.
जे.जे. रुग्णालयात ५० रुग्णांमागे केवळ दोन परिचारिका
मुंबईतील जे.जे. या सरकारी रुग्णालयात तब्बल ३५०० परिचारिकांची पदे नियुक्त आहेत. त्यापैकी सध्या केवळ ५५० परिचारिका कार्यरत आहेत. सध्याच्या घडीला किमान १ हजार ७०० पदे भरणे गरजेचे असल्याची माहिती जे.जे. परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा आरती कुंभरे यांनी दिली. सामान्य रुग्णसेवा विभागात ५० रुग्णांमागे एका शिफ्टमध्ये केवळ दोन परिचारिका कार्यरत आहेत. अतिदक्षता विभागात २८ रुग्णांमागे एका शिफ्टमागे तीन परिचारिकांची नियुक्ती केली आहे. परिचारिकांमध्ये कामाच्या नियोजित वेळेचे वेळापत्रक घसरत असल्याने, तब्येतीच्या तक्रारी वाढत असल्याची माहिती आरती कुंभारे यांनी दिली.
( हेही वाचा: गुन्हेगाराला ‘गुंडा’ का बोलतात माहितीय का? वाचा ‘गुंडा’ या शब्दाच्या उत्पत्तीची भन्नाट जन्मकथा )
२८ मेपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
कंत्राटीकरण रद्द करणे, प्रशासकीय बदली रद्द करणे आदी मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाले नाही, तर उद्यापासून तीन दिवस आझाद मैदानात आंदोलन पूर्ण झाल्यानंतर २८ मेपासून राज्यभरातील १९ हजार परिचारिका बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.
Join Our WhatsApp Community