गेल्या आठवड्यापासून वरुणराजाने राज्यातील बहुतांश भागांत गैरहजेरी लावली आहे. या आठवड्यातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाही. केवळ पावसाचे शिडकावे आणि हलका पाऊस होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसासाठी आवश्यक असणारा मान्सून ट्रफ सध्या राज्यावर सक्रीय नसल्याने पावसाची शुक्रवारपर्यंत शक्यता नाही.
महाबळेश्वरलाही पावसाचा जोर कमी झाला
सध्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरात राज्यात पावसाची हजेरी दिसून आली आहे. राज्यात गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला विदर्भात पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर मध्य महाराष्ट्रात थोडाफार पावसाच्या सरी कोसळत होत्या. महाबळेश्वरला सतत पावसाची संततधार सुरु होती. आता महाबळेश्वरलाही पावसाचा जोर कमी झाला आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत महाबळेश्वरला ६ मिमी, तर कोल्हापुरात ७ मिमी पाऊस झाला. राज्यातील सर्वात जास्त पाऊस विदर्भातील वर्धा जिल्ह्यांत झाल्याचे वेधशाळेच्या नोंदीत आढळले. सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत वर्ध्यात १९ मिमी पाऊस झाला.
(हेही वाचा राज्यातील या शहरामध्ये तापमानवाढीचा नवा गोंधळ)
यंदाच्या आठवड्यासाठी पावसाचा अंदाज
- संपूर्ण विदर्भात मंगळवारपर्यंत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राहील.
- मंगळवारनंतर हलका पाऊस किंवा शिडकावा दिवसभरात दिसून येईल.
- कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील ब-याचशा भागांत हलका पाऊस किंवा शिडकावे दिसून येतील.
- बुधवारी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वा-यांचा वेग ताशी ३० ते ४० वेगाने वाहणार आहे.
- बुधवारी आणि गुरुवारी कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह ताशी ३० ते ४० वेगाने वारे वाहतील.