Twin Towers Demolition: 800 कोटींचे टॉवर पाडण्यासाठी 17.55 कोटी रुपयांचा खर्च, ‘या’ तंत्रज्ञानाचा वापर

140

नोएडा येथील वादग्रस्त ट्विन टॉवर्स अखेर रविवारी जमीनदोस्त करण्यात आले आहेत. शहरातील भर वस्तीत कुतूबमिनार पेक्षाही उंच असलेले असे हे टॉवर्स पाडण्याची देशातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे हे टॉवर्स पाडणे हे प्रशासन आणि संबंधित कंपनी यांच्यासाठी मोठे आवाहन होते. एका अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हे बांधकाम यशस्वीरित्या पाडण्यात आले आहे. जवळपास 800 कोटी रुपयांचे हे दोन्ही टॉवर्स पाडण्यासाठी तब्बल 17.55 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. कोणते आहे हे अनोखे तंत्रज्ञान?

सुपरटेक बिल्डर्सकडून नोएडा सेक्टर-93 ए मध्ये 102 मीटर उंच एपेक्स टॉवर आणि 95 मीटर उंच सियेन टॉवर उभारण्यात आले होते. साधारणतः 2010 साली 200 ते 300 कोटी रुपये खर्चून हे बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे आता या टॉवर्समधील फ्लॅट्सचे बाजारमूल्य हे 800 कोटींच्या आसपास आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्य वस्तीत असलेले टॉवर्स पाडण्यासाठी वॉटर फॉल इम्ल्पोजन तंत्राचा वापर करण्यात आला. एडफिस इंजिनीअरिंग या कंपनीच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. या तंत्रज्ञानासाठी 17.55 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

मोठे स्फोट करत हे टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले. या स्फोटांसाठी दोन्ही टॉवर्समध्ये 9 हजार 640 होल तयार करण्यात आले होते. प्रत्येक होलमध्ये 40 ग्रॅम ते 160 ग्रॅमपर्यंत स्फोटके भरण्यात आली होती. दोन्ही टॉवर्समध्ये एकून 3 हजार 700 किलोंची स्फोटके भरण्यात आली होती. एपेक्स टॉवरमध्ये 170 तर सियेन टॉवरमध्ये 60 कॉलम तयार करुन काही कॉलममध्ये 4 आणि 5 होल तयार करण्यात आले होते. 10 भारतीय आणि 7 विदेशी ब्लास्टर्सच्या माध्यमातून हे ब्लास्ट घडवण्यात आले. 100 मीटर लांब अंतरावरुन इलेक्ट्रिक वायरच्या माध्यमातून ट्रिगर दाबत हे स्फोट घडवण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.