कोणतेही माध्यम असो मग ते मुद्रित असो किंवा इलेक्ट्रॉनिक त्यांनी काय दाखवावं हा पूर्णपणे त्या माध्यमाचा आणि त्याच्या धोरणाचा निर्णय असतो. मात्र काही वृत्तपत्र हे त्या-त्या पक्षाचे, नेत्याचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. इतकेच काय तर ती ओळख लपवूनही राहत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्या-त्या नेत्याच्या किंवा पक्षाच्या कोणत्या हलचाली सुरू आहेत याचा अंदाज सहज येतो. तसंच सामना या वृत्तपत्राला शिवसेनेचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं. सध्या शिवसेनेत काय चाललंय किंवा इतर पक्षात जे काही चाललंय, त्याकडे पाहण्याचा शिवसेना दृष्टीकोन नेमका कसा आहे, याचा अंदाज सामनावरुन लावला जातो. आजचा सामनाही त्याला अपवाद नाही. परंतु शिवसेनेला मोदींच्या काशी दौऱ्याचे वावडे असल्याचे आजच्या सामनातून समोर आले आहे. इतकेच नाहीतर त्यांनी राहुल गांधींना फ्रंटपेजवर स्थान देऊन त्यांचाचं उदोउदो केल्याचे पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा- ॲक्शन मोड ऑन! राज ठाकरेंचा आज नाशिक दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद)
…तर राहूल गांधीना फ्रंटपेजवर स्थान
आजच्या सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काशी विश्वनाथ कॉरीडॉरबद्दलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर एक शब्दही छापलेला नाही. त्याच्या उलट राहूल गांधीच्या ‘होय, मी हिंदू आहे’ला मात्र फ्रंटपेजवर स्थान दिलंय. नरेंद्र मोदी हे आजपासून दोन दिवस वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते काशी विश्ननाथ कॉरीडॉरच्या पहिल्या टप्याचं लोकार्पण करणार आहेत. काशी हे हिंदूंसाठी पवित्र स्थान असून बनारस, काशी या इतर नावांनीही हे शहर ओळखले जाते. हिंदू धर्मात काशीला तिर्थस्थळाचे स्थान असून हे शहर इतिहासापेक्षाही प्राचीन मानले जाते. सध्या पंतप्रधान मोदी हे वाराणसीचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्या पक्षांसाठी हे शहर किती महत्वाचं असू शकतं हे यावरून नक्कीच लक्षात येऊ शकतं.
मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सामनात एक शब्दही नाही
काशीचा काशी विश्वनाथ कॉरीडॉर आतापर्यंतचा सर्वात मोठा कायापालट करणारा प्रोजेक्ट मानला जातो. कोरोना महामारीदरम्यानही मोदी आणि योगी सरकारनं त्याचे काम थांबू दिले नाही. त्यामुळे त्याच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाले आहे. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने त्याचं लोकार्पण आज मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. उत्तर प्रदेशात पून्हा सत्तेवर येण्याचा भाजपचा मार्ग काशी विश्वनाथ प्रोजेक्टमधूनच जातो, असं देखील म्हटले जात आहे. शिवसेनाही कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करत आलेली असली तरी देखील आज मात्र मोदींच्या या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सामनात एक शब्दही छापला न गेल्याने चर्चेंना उधाण आले आहे. या उलट राहुल गांधींनी मी हिंदू आहे, हिंदू सत्याग्रही असतो, सत्ताग्रही नसतो हे सांगितलं, त्याला सामनात अग्रस्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
Join Our WhatsApp Community