गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करावे, अशी मगणी सातत्याने केली जात आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. या निर्णयाचे स्वागत झाले तसेच, त्याचा विरोधही झाला.
अशाच काही शहरांची नावे जी मागील काही वर्षांत बदलली गेली आहेत. केवळ शहरंच नाही तर राज्य आणि भाषा यांची नावेदेखील बदलली गेली आहेत.
बाॅम्बेचे मुंबई
बाॅम्बेचे मुंबई असे नाव 1996 मध्ये करण्यात आले. तत्कालीन शिवसेना आणि भाजप युती सरकारने हे नाव बदलले होते. मुंबईतल्या मुंबा देवीवरुन मुंबई हे नाव प्रचलित झाले आहे. मुंबईतील स्थानिक रहिवासी असलेले कोळी बांधव यांची मुंबा माता ही कुलदेवता आहे.
सुरुवातीला पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली सात बेटं म्हणजे मुंबई. पुढे आंदण म्हणून ते पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे आले. ब्रिटिशकाळात या शहराची मोठी भरभराट झाली. अनेक इतर भागातील रहिवासी इथे स्थायिक झाले.
अलाहाबादचे प्रयागराज
अलाहाबादचे नाव प्रयागराज होणार याला उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हे नामकरण काही पहिल्यांदा झाले नाही. इसवी सन 1583 मध्ये मुघल सम्राट अकबर याने प्रयाग हे नाव बदलून अलाहाबाद असे केले होते. त्याचा अर्थ अल्लाहने वसवलेले शहर असा होतो. गंगा- यमुना नदीच्या संगमावर वसलेले हे शहर कुंभमेळ्याचेदेखील स्थान आहे. हिंदूंच्या तीर्थस्थानांपैकी एक महत्त्वाचे तीर्थ म्हणजे तीर्थराज. त्यामुळे प्रयागराज या नावाने हे शहर ओळखले जाते.
गुरगांवचे गुरुग्राम
एप्रिल 2016 मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गुरगांवचे नाव बदलून गुरुग्राम करण्याची घोषणा केली. मंत्रिमंडळाने त्याला मान्यता देत औपचारिकरित्या गुरगांव किंवा गुडगाव म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता गुरुग्राम या नावाने ओळखले जाते.
कलकत्ताचे कोलकाता
पश्चिम बंगालची राजधानी असलेले हे शहर आता कोलकाता नावाने ओळखले जाते. एकेकाळी ब्रिटीश साम्राज्याची राजधानी असलेले हे शहर आजही भारतातील तितकेच महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते.
कोलाकाता ही भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील ओळखली जाते. सिटी ऑफ जाॅय हे या शहराचे टोपणनाव असून ते त्या शहराचे वर्णनच आहे. कोलकाता हे नाव कोलिकाता या नावापासून आले आहे.
( हेही वाचा: पश्चिम रेल्वेवर केव्हा धावली पहिली लोकल? स्टेशनची नावं सुद्धा होती हटके )
मंगलोरचे मंगळुरु
कर्नाटकातील प्रमुख बंदर असलेले शहर म्हणजे मंगळुरु. 2014 मध्ये या शहराचे नाव मंगळुरु असे बदलण्यात आले. मंगलादेवी या देवीच्या नावावरुन या शहराचे नाव आले आहे.
बंगलोरचे बेंगळुरु
आपल्या देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी असा लौकिक या शहराचा आहे. नोव्हेंबर 2006 मध्ये बेंगळुरु असे नाव बदलण्यात आले.
म्हैसूरचे म्हैसूर
म्हैसूर राज्याची राजधानी असलेले हे शहर ऐतिहासिक आहे. जवळजवळ 6 शतके हे शहर राजधानीचे शहर होते.
(1399-1956)
मद्रासचे चेन्नई
1996 मध्ये मद्रासचे चेन्नई असे नाव बदलण्यात आले. मद्रास हे नाव स्थानिक मच्छीमारांच्या वास्तव्यावरुन आले होते. चेन्नई हे नावदेखील स्थानिक देवतेच्या नावापासून आले आहे.
पाॅंडिचेरीचे पुड्डुचेरी
दिल्लीप्रमाणेच केंद्रशासित असेलला परंतु राज्य दर्जा असलेले पाॅंडिचेरी पुढे पुड्डुचेरी झाले. हे नाव 2006 मध्ये बदलण्यात आले. हे तामिळ नाव असून याचा अर्थ नवीन शहर असा होतो.
ओरिसाचे ओडिशा
2011 मध्ये राज्याचे नाव ओरिसाचे ओडिशा आणि राज्यभाषेचे नाव ओरिसाचे ओडिशा करण्यात आले. 15 व्या शतकात सरल दास यांनी महाभारताचा ओडिया भाषेत अनुवाद केला होता.
ही काही महत्त्वाची शहरे आणि राज्य आहेत ज्यांची नावे बदलली गेली.
Join Our WhatsApp Community