महाराष्ट्रात सध्या कोरोनाने थैमान घातले असून, आता हा टप्पा ४० हजारांच्याही वर पोहोचला आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून राज्य सरकारने राज्यात काही निर्बंध घातले आहेत. राज्यात या नव्या निर्बंधांना सुरुवात झाली असून, रात्री आठ नंतर राज्यात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. एकीकडे राज्य सरकार खबरदारी घेत असताना, आता राज्याच्या मदतीसाठी केंद्रीय पथक देखील धावून आले आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्राने विशेष पथकाची स्थापना केली असून, राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये हे पथक राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याच्या कामामध्ये मदत करणार आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी मोडण्याच्या ब्रेक दि चेन मोहिमेत आता राज्य सरकारची ताकद वाढणार आहे.
असे काम करणार पथक
या पथकामध्ये दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ज्यात एक साथीचा रोग विशेषज्ञ आणि एका सार्वजनिक आरोग्य तज्ञ्जाचा समावेश असेल. हे पथक राज्यातील ज्या ३० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा ठिकाणी जाऊन सर्व कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. ज्यात टेस्टिंग योग्य पद्धतीने पार पाडले जात आहे की नाही, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन व इतर महत्वाच्या गोष्टींचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत आहे की नाही, यावर हे पथक लक्ष ठेवणार आहे. चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण या पाच कलमी उपायांच्या निकषांचा आढावा घेऊन जिल्ह्यांमध्ये काम कसे सुरू आहे, याचा अहवाल ही समिती तयार करणार आहे. केंद्राने महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांसह छत्तीसगडमधील ११ तर, पंजाबमधील ९ जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या मदतीसाठी विशेष पथक पाठवले आहे.
(हेही वाचाः कोरोना : बेफिकीरी आणि निष्काळजीपणा!)
काय म्हणाले पंतप्रधान?
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही अटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. काल पुन्हा एकदा राज्यात तब्बल ४७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घेतलेल्या बैठकीत साथीच्या काळात पाळावयाच्या नियमांचा भंग, सुरक्षात्मक उपायांचा अभाव व वर्षभराच्या साथीमुळे आलेला ताणतणाव, या तीन कारणांमुळे अलीकडच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगितले होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे केंद्राने राज्यांना यापूर्वीच गर्दी टाळण्यापासून इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना केल्या असून, त्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर हे उपाय सुचवण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यातील ढिलाईमुळे रुग्णवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. विषाणूमध्ये झालेल्या उत्परिवर्तनामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.
Join Our WhatsApp Community