बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला सिंह मिळवून देण्यासाठी खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. गेल्या कित्येक वर्षांपासून गुजरात दरबारी या मागणीसाठी राज्य वनविभागाची विनवणी सुरु असताना अखेर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच सोमवारी गुजरात राज्याला भेट दिली. राज्याला सिंह मिळावेत, या मागणीसाठी मुनगंटीवार यांनी गुजरात राज्याचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सिंहाची जोडी गुजरातहून येण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. सिंह आणण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी घेतल्यानंतर सिंहांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले जाईल.
( हेही वाचा : चर्नीरोड रेल्वे स्थानकाचा झोपडप्यांचा विळखा सुटला, ३२ झोपड्यांवर महापालिकेची कारवाई)
बोरिवलीत केवळ जेस्पा (११) आणि रवींद्र (१८) हे दोघेच सिंह आहेत. त्यापैकी रवींद्र या सिंहाची वयोमानामुळे तसेच आर्थरायटीस आजारामुळे हालचाल थांबली आहे. रवींद्र एका पिंज-यात तासनतास निपचित पडून असतो. रवींद्र पूर्वीसारखा चिडचिड करत नाही. रवींद्र वार्धक्यात असल्याने वयोमानामुळे रवींद्रचा कधीही मृत्यू होऊ शकतो. उद्यानात सिंहाची जोडी गुजरातमधील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून मिळाल्यास त्यांच्या मिलनातून उद्यानात सिंहाची संख्या वाढू शकते, परिणामी सिंह सफारीही पुन्हा कार्यान्वित होऊ शकते. उद्यानात सफारीसाठी येणा-या पर्यटकांना केवळ वाघाचे दर्शन घेता येते. सिंहदर्शन पर्यटकांना बंद असल्याने असंख्य पर्यटक उद्यान प्रशासनाविरोधात तक्रार करत आहेत. उद्यानाला नवे सिंह मिळाले नाही तर रवींद्रपाठोपाठ वार्धक्यात पोहोचलेल्या जेस्पा सिंहाच्या मृत्यूनंतर सफारी बंद होईल. २०१६ सालापासून उद्यान प्रशासनाचे गुजरातच्या सक्करबाग प्राणिसंग्रहालयाशी बोलणे सुरु आहे. सिंहाऐवजी उद्यानातून मिळणा-या प्राण्याच्या प्रस्तावावर एकमत न झाल्याने सिंहांचे उद्यानातील आगमन लांबले.
अखेरीस ४ एप्रिल रोजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम डॉ. व्ही क्लेमेंट बॅन यांनी उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांच्यासह गुजरात गाठले. दोन्ही वरिष्ठ वनाधिका-यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाला भेट देऊन सिंहांची मागणी केली. मोबदल्यात उद्यानातील वाघाची जोडी सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला दिली जाईल. एप्रिलनंतर थेट वनमंत्रीच सोमवारी गुजरात येथील अहमदाबाद येथे दाखल होत सिंहाच्या मागणीसाठी वनराज्य मंत्री जगदीश विश्वकर्मा यांना भेटले. दोन्ही मंत्र्यांनी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून मान्यता मिळण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे ठरवले.
Join Our WhatsApp Community