आता नागरिकांना मिळणार ‘विशेष पोलिस अधिकार’! कसे? वाचा…

जर कोणी ऐकत नसतील तर याबाबतची माहिती पोलिस ठाण्याला देण्याची जबाबदारी विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या नागरिकांवर असेल.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लावण्यात आलेले कडक निर्बंधांचा सर्वाधिक ताण पोलिस प्रशासनावर पडत आहे. पोलिसांवर पडणारा हा ताण कमी करण्यासाठी, मुंबई पोलिसांनी काही पाऊले उचलली आहेत. नाकाबंदी, बंदोबस्त तसेच प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी, तसेच पोलिसांना मदत होईल या दृष्टिकोनातून पोलिस दलाचा एक हिस्सा नागरिकांना पोलिसांचे विशेष अधिकारी म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीला धावून जाणारे स्वच्छ प्रतिमेचे, तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या एक हजार पेक्षा अधिक नागरिकांना पोलिस दलात सामावून घेण्यात आले असून, सुमारे अकराशे नागरिकांना ‘विशेष पोलिस अधिकारी’ म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

अकराशे जणांना विशेष नियुक्ती पत्र

कोरोना महामारीमुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडली असताना, पोलिसांवर याचा अधिक ताण येत आहे. राज्यात लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे सरकारच्या आदेशांचा नियमभंग होऊ नये म्हणून, पोलिस यंत्रणा ही दिवस-रात्र राबत आहे. गेल्या वर्षी कर्तव्य बजावताना हजारो पोलिसांना कोरोना संसर्ग झाला होता व शेकडो पोलिसांचा मृत्यू देखील झाला. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घेतले असताना, पोलिसांना मात्र रस्त्यावरील होणारी नागरिकांची गर्दी, मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई, नाकाबंदी, वाहन तपासणी, प्रतिबंधित क्षेत्रात बंदोबस्त त्यात रोजच्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्याचे काम, यांमुळे पोलिस दलात मनुष्यबळ अपुरे पडत आहे. कामाचा भार कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आपल्या कामाचा हिस्सा करण्याचे ठरवून, सुमारे अकराशे जणांना विशेष पोलिस अधिकार देण्यात आले आहेत. या अकराशे जणांना परिमंडळ (झोन) मधील पोलिस उपआयुक्त यांच्याकडून तात्पुरते नियुक्ती पत्र दिले आहे.

(हेही वाचाः पोलिसांना आता ‘गर्मी में भी थंडी का एहसास’!)

काय असणार जबाबदारी?

मुंबईत असणाऱ्या तेरा परिमंडळांत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. स्वच्छ प्रतिमा, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणारे तरुण-तरुणी आणि पोलिसांच्या कामात नेहमी मदत करणाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेले नागरिक हे प्रतिबंधित क्षेत्र, नाकाबंदी, बंदोबस्त, वाहन तपासणी या कामात पोलिसांना मदत करतील. प्रतिबंधित क्षेत्रात विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणारे, गर्दी करणारे यांना समजावून सांगणे, जर कोणी ऐकत नसतील तर याबाबतची माहिती पोलिस ठाण्याला देण्याची जबाबदारी विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या नागरिकांवर असेल.

…तर कारवाई होणार

मात्र ज्यांना विशेष पोलिस अधिकारी या पदावर नियुक्त करण्यात आले आहे, त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन नागरिकांना त्रास देऊ नये. याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याकडून हे अधिकार काढून, कारवाई करण्यात येईल असे एका वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले.

(हेही वाचाः आपत्कालीन कारणासाठी प्रवास करायचा आहे, काय करायचे? वाचा महाराष्ट्र पोलिसांचे उत्तर)

कोण देतात हे अधिकार

पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी हे विशेषाधिकार नागरिकांना देतात. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम २१ (१) मध्ये दिलेल्या विशेषाधिकारांतर्गत तसेच पोलिस आयुक्त, मुंबई यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १० अन्वये पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकारी, एखाद्या व्यक्तीला विशेष पोलिस म्हणून नेमतो. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१चे कलम २१ (२) (ब) अन्वये पोलिस अधिकाऱ्यास जे अधिकार, कामे व विशेषाधिकार आहेत, ते सर्व या व्यक्तीस लागू असतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here