अपक्षांमुळे शिवसेनेत होणार कलह

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग आरक्षण जाहिर झाल्याने आता अनेक प्रभागांमध्ये इच्छुकांमध्येच रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी आता प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. परंतु यामध्ये मागील निवडणुकीत निवडून आलेले अपक्ष आता शिवसेनेत परतल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्येच कलह निर्माण होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : बोरीवली पश्चिमेतील त्या पुलाचे काम पूर्ण; लवकरच होणार वाहतुकीसाठी सुरु )

या अपक्षांनी शिवसेनेला समर्थन देत पक्षात प्रवेश केला

सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत घाटकोपर पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १२३मधून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या स्नेहल मोरे, दिंडोशीमधील प्रभाग क्रमांक ४२ तुळशीराम शिंदे आणि चांदिवली विधानसभेतील प्रभाग क्रमांक १६०चे किरण लांडगे या अपक्षांनी शिवसेनेला समर्थन देत पक्षात प्रवेश केला.

कुर्ला एल विभागातील प्रभाग क्रमांक १६०मध्ये तिकीट न दिल्याने किरण लांडगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहत शिवसेनेच्या उमेदवार माजी नगरसेविका अश्विनी मते यांचा पराभव केला होता. मागील निवडणुकीत खुला असलेला हा प्रभाग आता नव्या प्रभाग आरक्षणात महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेच्या माजी नगरसेविका व पदाधिकारी अश्विनी मते यांनी आपला दावा मांडला आहे, तर दुसरीकडे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी आपल्या पत्नीसाठी ही दावा सांगितला आहे. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेकडून किरण लांडगे यांची पत्नी तसेच माजी नगरसेविका अश्विनी मते यांच्या तिकीटासाठी जुंपली जाणार आहे.

तर प्रभाग क्रमांक १२३मधून शिवसेनेने माजी नगरसेविका डॉ.भारती बावदाने यांना उमेदवारी दिल्याने माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आपल्या वहिनींना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरवले. या निवडणुकीत बावदाने यांचा पराभव अपक्ष उमेदवार स्नेहल मोरे यांनी केला होता. स्नेहल मोरे यांना या निवडणुकीत ९६२२ मते मिळाली होती, तर बावदाने यांना ८५६७ मते मिळाली होती. परंतु हा प्रभाग आता खुला झाल्याने या स्नेहल मोरे,सुधीर मोरे यांच्यासह डॉ भारती बावदाने तसेच त्यांचे पत्नी यांचाही दावा असणार आहे.

या कलहावर पक्षाचे नेते कसा मार्ग काढणार

तर पी उत्तर विभागातील प्रभाग क्रमांक ४१ मधून शिवसेनेने पुन्हा सदाशिव पाटील यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे पदाधिकारी तुळशीदास शिंदे यांनी बंडखोरी केरत अपक्ष म्हणून आव्हान निर्माण केले होते. या निवडणुकीत शिंदे यांनी ६२१७ मते मिळवत विजय मिळवला होता, तर शिवसेनेचे सदाशिव पाटील यांना केवळ ३८६९ मते मिळवत आली होती. परंतु पुन्हा एकदा हा प्रभाग खुला झाला आहे. त्यामुळे शिंदे आणि सदाशिव पाटील यांच्यामध्ये पुन्हा एकदा दावेदारी सांगताना दिसणार आहे.

या सत्ता स्थापनेच्यावेळी शिंदे यांच्यासह स्नेहल मोरे आणि किरण लांडगे यांनी शिवसेनेला समर्थन देत पक्षात पुन्हा प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे प्रभाग आता बदलल्याने विद्यमान नगरसेवक आणि मागील निवडणुकीतील पक्षाचे उमेदवार यांच्यातच आता तिकीटासाठी मारामारी होणार असल्याने यामुळे निर्माण होणाऱ्या कलहावर पक्षाचे नेते कसा मार्ग काढणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here