महापालिकेच्या नगर अभियंता विभागाच्या माध्यमातून अभियंत्यांची नियुक्ती प्रशासकीय कार्यालयात (वॉर्ड ऑफीस) झाल्यानंतर तेथील सहायक आयुक्त हे परस्पर अभियंत्यांच्या कामांमध्ये बदल करत आहे. त्यामुळे आता अभियंत्यांच्या कर्तव्यामध्ये बदल करण्यास सहायक आयुक्तांना निर्बंध घालण्यात आले आहे. सहायक आयुक्तांना विभागातील नियुक्त झालेल्या अभियंत्यांच्या कामात ढवळाढवळ करता येणार नसून नियुक्त अन्य ठिकाणच्या कामा व्यतिरिक्त अन्य जबाबदारी सोपवता येणार नाही. यापुढे सहायक आयुक्तांना विभागातील कोणत्याही अभियंत्यांच्या कामात बदल करायचे झाल्यास त्यांना आता परिमंडळ उपायुक्तांची संमती घेणे बंधनकारक राहणार आहे.
( हेही वाचा : …तर कायदेशीर पावले उचलीन; संजय राठोडांचा चित्रा वाघ यांना इशारा)
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व खाते विभाग, रुग्णालयांमधील अभियंता संवर्गातील पदे ही नगर अभियंता कार्यालयामार्फत भरण्यात येतात. परंतु विभाग कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या कर्तव्याच्या ठिकाणांमध्ये विभाग स्तरावर सहाय्यक आयुक्त्तामार्फत बदल केले जातात. अशा प्रकारची बाब परमंडळीय उपायुक्तांनी पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे विभाग कार्यालयातील अभियंता संवर्गातील उमेदवारांच्या विभागांतर्गत नियुक्तीसंबंधी विभाग कार्यालयातील सर्व सहाय्यक आयुक्तांना त्यांनी परिपत्रकाद्वारे सूचना केल्या आहेत.
नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाच्यावतीने ४ ऑगस्ट २०२२ रोजी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये विभाग स्तरावर केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्ये अभियंता संवर्गातील उमेदवारांची विभागातील अंतर्गत खात्यांमध्ये अर्थात उप विभागांमध्ये बदली करावयाची झाल्यास (जसे देखभाल विभागातून इमारत कारखाना), संबंधित सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागीय उपायुक्तांना प्रस्ताव सादर करावा. विभागीय उपायुक्तांच्या मान्यतेनंतर तसा प्रस्ताव नगर अभियंता कार्यालयामार्फत मंजुरीसाठी संचालक तसेच अतिरिक्त आयुक्त ( पू.उपनगरे.) यांना सादर करावा,असे नमुद केले आहे.
उपविभागांतर्गत बिट निहाय बदली करणे आवश्यक असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या विभागीय उपायुक्तांची मंजुरी घ्यावी, आणि अशाप्रकारे करण्यात आलेल्या बदली आदेशाची एक प्रत नगर अभियंता कार्यालयात पाठवावी. सहाय्यक आयुक्त यांनी अभियंता संवर्गातील उमेदवाराच्या यापूर्वी केलेल्या बदल्यांना संबंधित परिमंडळीय उप-आयुक्त यांची कार्योत्तर मंजुरी घ्यावी,असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community