मुंबईच्या सागरी किनारा रस्ता प्रकल्पाला राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर मच्छिमार संघटनांनी आता एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पालिकेच्यावतीने किनारा प्रकल्पासाठी मच्छिमारांना मिळणा-या सोयीसुविधांच्या माहितीची पत्रके घेऊन येणा-या पालिका अधिका-यांना वरळी कोळीवाड्यातून अक्षरशः हाकलून दिले गेले. आता प्रकल्पाला विरोध करण्यासाठी महिला मच्छिमार पुढाकार घेत असल्याचे बुधवारी झालेल्या मच्छिमार संघटनांच्या बैठकीत निश्चित झाले.
( हेही वाचा : मुंबई पोलीसांच्या अंतर्गत बदल्या! ऑर्डरली, मिल्स स्पेशल, इंचार्ज हटवले काय आहे कारण वाचा)
मच्छिमार संघटनांनी नाराजी व्यक्त केली
किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत समुद्रात उभारल्या जाणा-या दोन खांबांमध्ये ६० मीटर अंतर योग्य असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेने पालिकेला दिला. पालिकेने मच्छिमार संघटनांचा विरोध टाळण्यासाठी विविध योजनांची घोषणाही केली. मात्र या घोषणांवर मच्छिमार संघटनांनी नाराजी व्यक्त केली. समुद्रात रस्ता बांधलेल्मुळे वरळी ते प्रियदर्शनी भागांत मासेमारी पूर्णपणे नष्ट झाली. पूलावर सीसीटीव्ही कॅमे-यासह आपत्तीकाळात मदत कमी काळात मिळणे दूरच पण पाच मिनिटांतच बोटी किना-याला थडकून आमचे मृतदेह सापडतील, अशी भीती मच्छिमार नितेश पाटील यांनी व्यक्त केली. मरणानंतर कुटुंबीयांना पालिका किती काळ पोसणार ? विम्याची रक्कम नेमकी किती ? हे प्रश्न अधांतरीच असल्याचे पाटील म्हणाले.
गुरुवारी कोळीवाड्यात मच्छिमारांना मिळणा-या सोयीसुविधांची माहिती देणारे अधिकारी पत्रके वाटत होते. मात्र आपला विरोध दर्शवण्यासाठी कोळीवाड्यातील मच्छिमारांनी त्यांना दरवाजावरुनच परतवले. रस्त्यावर पत्रके वाटणा-यांनाही आम्ही हकलवले अशी माहिती पाटील यांनी दिली. आम्हांला या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे का , याचे उत्तर कोणीच दिलेले नाही, अशी तक्रारही पाटील यांनी केली.
Join Our WhatsApp Community