रेडिओ कॉलर वाघिणींना सोडण्यापूर्वी हवा अॅक्शन प्लान

देशातील वाघांचे जन्म, मृत्यू तसेच जंगल आणि प्राणी संग्रहालयातील उपाययोजना तसेच कार्यक्रमांबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला माहिती देणे बंधनकारक असते. वाघांना एका जंगलातून दुस-या जंगलात स्थलांतरित करण्यापूर्वी वनविभागाला केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. चंद्रपुरात राज्यातील जवळपास ८० टक्क्यांहून अधिक वाघांची संख्या दिसून आली आहे. वाघांना जंगलाचे क्षेत्रफळ कमी मिळत असल्याने, नव्याने जन्मलेल्या वाघांना आपल्या हक्काचे जंगल शोधताना जंगलाबाहेर येणे चंद्रपुरात आता क्रमप्राप्त होऊ लागले आहे. या हद्दीच्या वादात चंद्रपुरात वाघाच्या वाढत्या हल्ल्यांवर उपाययोजना म्हणून वाघांना रेडिओ कॉलरिंग करुन नवेगाव नागझिरा येथे सोडण्याची राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने नुकतीच परवानगी दिली आहे.

वाघिणींना सोडण्यापूर्वी याबाबतचा अॅक्शन प्लान वनविभागाला राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला सुपूर्द करावा लागेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. अंदाजे मे महिन्याच्या जवळपास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे परवानगीसाठी हा प्रस्ताव पाठवला होता. तोपर्यंत नवेगाव-नागझिरा येथे दोन वाघ रेडिओ कॉलरिंग करुन सोडण्याचा वनविभागाचा विचार सुरु होता. त्यानंतर आता दोनऐवजी चार वाघीण सोडल्या जाण्याबाबत माहिती दिली गेली.

वनाधिका-यांमध्ये चर्चा सुरु 

चंद्रपुरातील वाघांची निवड करताना संघर्ष भागांतून किंवा हल्लेखोर वाघांची निवड करु नये, हा मुद्दा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणासोबत वनविभागाच्या अधिका-यांच्या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाघांची निवड करताना ब्रह्मपुरीच्याऐवजी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांचा प्राधान्यक्रमाने विचार करावा, तसेच वाघांना रेडिओ कॉलरिंग केल्यानंतर जंगलात सोडल्यानंतर वनाधिका-यांकडून कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबत योजनात्मक कार्यपद्धती (अॅक्शन प्लान) प्राधिकरणाकडे सुपूर्द करावी, अशा सूचनाही दिल्याचे समजते. चारही वाघीण सोडण्याबाबत वनाधिका-यांच्या वर्तुळातच चर्चा सुरु आहे. नवेगाव नागझिरा येथे वाघिणींची संख्या मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे वाघीण निवडण्याबाबतही वनाधिका-यांमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत.

  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागांतील वाघांची अंदाजे संख्या – ९०
  • ब्रह्मपुरीतील वाघांची अंदाजे संख्या – ८०च्यावर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here