राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, पोलिस दलाला देखील कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांत राज्यात ९५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सर्वाधिक पोलिसांचे मृत्यू हे एप्रिल महिन्यात झाले आहेत. एप्रिल महिन्यात ६४ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलिस दलातील ही धक्कादायक आकडेवारी असल्याचे समजते.
९५ कर्मचारी आणि अधिका-यांचा मृत्यू
कोरोना नियमांचे नागरिकांनी पालन करावे, यासाठी पोलिसांना रस्त्यावर येऊन काम करावे लागत आहे. त्यामुळे लोकांशी थेट येणाऱ्या संपर्कामुळे पोलिस दलात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका पोलिसांना बसत असून, जानेवारी २०२१ ते ३ मे २०२१ पर्यंत राज्यभरात ९५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
(हेही वाचाः 50 वर्षांवरील पोलिसांसाठी कामाच्या नवीन वेळा… मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय)
एप्रिल महिन्यातील मृतांची संख्या चिंताजनक
एप्रिल महिन्यात ६४ पोलिसांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यातील मृतांची ही आकडेवारी चिंताजनक असून, मे महिन्यात ३ मे पर्यंत म्हणजे, केवळ तीन दिवसांत ५ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पोलिस दलातील मृत्यूची संख्या सर्वाधिक असून, मागील वर्षी ३३२ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मात्र, मागील चार महिन्यांत ९५ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. २०२० ते मे २०२१ या दरम्यान राज्यभरात ४२७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सर्वाधिक मृत्यूचा आकडा मुंबई पोलिस दलाचा आहे. त्या पाठोपाठ ठाणे आणि नवी मुंबई पोलिस दलात सर्वधिक पोलिसांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.
२०२१ मध्ये पोलिसांच्या मृत्यूचं प्रमाण
जानेवारी– १२ पोलिसांचा मृत्यू
फेब्रुवारी– २ पोलिसांचा मृत्यू
मार्च– १२ पोलिसांचा मृत्यू
एप्रिल– ६४ पोलिसांचा मृत्यू
मे– ५ पोलिसांचा मृत्य (३ मे पर्यंत)
(हेही वाचाः कोरोनामुक्त तुरुंगांसाठी तळोजा पॅटर्न राबवावा!)
Join Our WhatsApp Community