सलग तीन दिवस एक तास सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यात सकाळच्या वेळेत परिचारिकांनी काम बंद ठेवले. मात्र सरकारी पातळीवर चर्चेसाठी आमंत्रण येत नसल्याने गुरुवारी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये आणि दवाखान्यात परिचारिकांनी दिवसभर काम बंद आंदोलन केले. मुंबईतील तिन्ही नामांकित सरकारी रुग्णालयांत १०० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्याची माहिती रात्री उशिराने आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
( हेही वाचा : परिचारिकांच्या धुलाई भत्त्यावर केंद्राकडून सर्फ पावडर तर राज्याकडून माती – दरेकर)
परिचारिकांच्या संपामुळे, प्राथमिक धडे घेणा-या विद्यार्थ्यांना, मेट्रोनना रुग्णसेवेसाठी आरोग्य विभागाने नियुक्त केले. राज्यातील १९ सरकारी रुग्णालयात आज एकाही परिचारिकेने रुग्णसेवेत सहभाग नोंदवला नाही. परिणामी राज्यातील १३ नर्सिंग महाविद्यालयातील केवळ अडीच ते तीन हजार नर्सिंगचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी दिवसभर रुग्णसेवेत गुंतवले गेले. डॉक्टर, मेट्रोनच्या देखरेखीखाली रुग्णालयांतील बाह्य रुग्णसेवा व्यवस्थित पार पडली. मात्र नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाकडून दिली गेली. संबंधित अधिका-यांनी पुढे ढकललेल्या शस्त्रक्रियांचा नेमका आकडा जाहीर करण्यास नकार दिला.
या विद्यार्थ्यांना अद्यापही पूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. मात्र रुग्णसेवेत हलगर्जीपणा नको म्हणून विद्यार्थ्यांना धारेवर धरणे, चुकीचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केले. आज राज्यभरातील तब्बल १९ हजार परिचारिकांनी रुग्णसेवेला ब्रेक दिला. उद्याही सरकारच्यावतीने बोलावणे आले नाही तर काम बंदची भूमिका आम्ही कायम ठेवू, २८ मे नंतर बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशाराही संघटनेच्यावतीने कायम ठेवण्यात आला.
संपाचा परिणाम –
– जेजेत केवळ २३ अत्यावश्यक शस्त्रक्रिया पार पडल्या
– जीटी आणि सेंट जॉर्जेस येथे अंदाजे ४० शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या