राज्यातील सरकारी रुग्णालयातील १ हजार ७१६ परिचारिकांच्या रिक्त पदांवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती नको, या मागणीसाठी सरकारी रुग्णालयातील परिचारिकांच्या पाठिशी आता खासगी रुग्णालयातील परिचारिकाही उभ्या राहिल्या आहेत. सरकारी रुग्णालयातील परिचारिकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हीदेखील संपूर्ण राज्यभरात काम बंद आंदोलन करु, असा इशारा खासगी रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.
( हेही वाचा : UPSC निकालात महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवार यशस्वी)
खासगी रुग्णालयातील परिचारिका पाठिशी
आंदोलनाला पाठिंबा म्हणून ३१ मे रोजी राज्यातील प्रायव्हेट नर्सिंग स्कूल एण्ड कॉलेजेस मॅनेजमेंट असोसिएशन औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत. १०० परिचारिका, २५० विद्यार्थी परिचारिका आणि ५० शिक्षक परिचारिका निदर्शनात सहभाग नोंदवतील. युनायटेड नर्सेस असोसिएशन या खासगी रुग्णालयातील परिचारिका संघटनेने १२ मे रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परिचारिकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाने २०१६ साली दिलेल्या आदेशानुसार, शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांमध्ये व रुग्णालयांमध्ये किमान वेतन आणि समान काम देण्याचा निर्णय दिला. हा निर्णय अंमलात आणण्याची मागणी युनायटेड नर्सेस असोसिएशनने केली.
Join Our WhatsApp Community