घाटकोपर येथील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात शनिवारी अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या नातेवाईकांनी परिचारिकेला शिवीगाळ केल्याचा आरोप परिचारिकांकडून केला जात आहे. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ६ जूनला सकाळी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित परिचारिका हृदयविकाराचा रुग्ण असल्याने त्याची चादर बदलण्यासाठी आलेली असताना नातेवाईक आणि परिचारिकेमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
( हेही वाचा : कॉफी मशीनचा शोध लावणाऱ्या अँजेलो मोरिओन्डोसाठी Google ने साकारले अनोखे Doodle!)
रुग्णाच्या नातेवाईकाविरोधात तक्रार दाखल
परिचारिकेवर बिभत्स टिप्पणी केल्याने प्रकरण तापले. याविरोधात सोमवारी परिचारिकांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले. निषेध मोर्चावेळी दोन कामगार युनियनमध्येच वाद रंगल्याचे चित्र दिसून आले. आंदोलनकर्त्या परिचारिकांना दुस-या गटाकडून एकेरी भाषा वापरल्याने सकाळी राजावाडी रुग्णालयात तणावाची परिस्थिती होती. परिचारिकांनी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला नाही. संबंधितांविरोधात तातडीने कारवाई करण्यासाठी आम्ही निषेध आंदोलने केलीत, असे परिचारिकांच्यावतीने सांगण्यात आले. त्यानंतर परिचारिका अधीक्षक कार्यालयात दुपारपर्यंत चर्चेत सहभागी होण्यासाठी गेल्या. चर्चेतील तपशील मात्र मिळू शकला नाही. राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ भारती राजुलकर व्यस्त असल्याने त्यांच्याशी घटनेबाबत बोलता आले नाही. दरम्यान, रविवारीच टिळकनगर पोलिस स्थानकात रुग्णाच्या नातेवाईकाविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community