तिसऱ्या लाटेपूर्वी पदभरती करा! राज्यातील परिचारिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

122

सन २०१९ मध्ये जगभरात कोविड १९ या महामारीच्या स्वरुपात जागतिक संकट जगावर ओढवले, या महामारीत जगभरात प्रचंड जीवितहानी झाली, याला महाराष्ट्र अपवाद नव्हता, जगभरातील परिचारीकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या जिवाची पर्वा न करता या युद्धात स्वतःला झोकून दिले. अत्यंत अपुऱ्या मनुष्यबळावर, जिथे अतिदक्षता विभागात एका रुग्णासाठी एक परिचारिका, असे प्रमाण असणे आवश्यक असताना ५०-६० रुग्णांची जबाबदारी एका परिचारीकेवर पडली, तरीही जिवाची बाजी लावून परिचारीकांनी कोविड-१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या जीवघेण्या युद्धास तोंड दिले.

२ वर्षांपासून लेखी व तोंडी आश्वासने देऊनही पदभरती नाही

निरंतर कार्य करूनही दीड वर्षे उलटून गेले, तरी परिचारीकांची पदभरती करण्यास मात्र शासनाला मुहूर्त मिळाला नाही, यावरुन शासन परिचारीकांचा गांभीर्याने विचार करत नाही. हेच दिसून येते. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. गेले दीड वर्षे परिचारिका आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक काळजी, जबाबदाऱ्या बाजूला ठेवून कुटुंब मुला-बाळापासून दूर राहून, जिवाची पर्वा न करता, अत्यंत अपुऱ्या मनुष्यबळावर असंख्य अडचणींना तोंड देत कोविड रुग्णांना सेवा दिली आणि आजही देत आहेत. परंतु आजतागायत त्यांच्या मागण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे, अशी परिचारिकांची धारणा होत असून, त्यामुळे परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराज आहे. गेले २ वर्षांपासून अनेक वेळा, लेखी व तोंडी आश्वासने देऊनही अद्यापपर्यंत पदभरती झालेली नाही.

शासनाने मंजुरी देऊनही पदभरती नाही

प्रसंगी कोविड-१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान शासनाने केरळहून परिचारिकांची मागणी केली होती, तसेच कंत्राटी भरतीने ही परिचारिका घेतल्या गेल्या. परंतु आता देशात व राज्यात ओमायक्रॉन संक्रमणाचे वेगवान संकट वेगाने फैलावत असताना, शासनस्तरावर पदभरतीबाबत गांभीर्याने कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तत्कालीन संचालक यांनी मार्च २०२१ पूर्वी राज्यात परिचारिकांचे एकही पद रिक्त राहणार नाही, असे आश्वासन दिले. प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. मे २०२१ मध्येच शासनाने १०० टक्के पदभरती करण्यास मंजुरी दिली होती, परंतु २०२१ वर्ष अखेरीसही पदभरती का होऊ शकली नाही, हे कळण्यास मार्ग नाही. चंद्रपूर, गोंदीया, जळगाव येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आली. परंतु ते चालवण्यासाठी अत्यावश्यक असलेली परिचारिकांची पदे २५% सुद्धा भरण्यात आली नाहीत. राज्यात नव्याने निर्माण झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी, नव्याने पदनिर्मिती करून पदभरती होणे अत्यावश्यक आहे.

परिसेविकांची पदे रिक्त

परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील (शैक्षणिक व शुश्रुषा विभागातील) १०० टक्के पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती या प्रमुख मागणीसाठी राज्यातील परिचारिकांनी २ वेळा राज्यस्तरीय आंदोलने केली, परंतु राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागातील गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात सर्व स्तरावरची पदे रिक्त आहेत. कोविड काळात टेंडरभरती करण्यात आली व कालांतराने काढूनही टाकण्यात आले. परिसेविकांची ही पदे रिक्त असल्यामुळे त्यांचा कार्यभार वरिष्ठ परिचारिकांना दिला जातो. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्ण सेवा देणारे मनुष्यबळ अत्यंत अपुरे पडत आहे. राज्यात परिचारिकांची संख्या अत्यल्प आहे, रुग्ण व डॉक्टर यांचे प्रमाण राखण्यासाठी नवनवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येत आहे, त्याचबरोबर त्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले परिचारिका संवर्गाचे मनुष्यबळ वाढविणे ही अत्यंत गरजेचे आहे, राज्यातील प्रत्येक संस्थेमध्ये परिचारिका संवर्गाची किमान ४०% रिक्त पदे आहेत. त्यामुळे सर्व स्तरावरची, १००% पदोन्नती, पदनिर्मिती व पदभरती ही अत्यावश्यक बाब आहे. त्याबाबतची कार्यवाही अनेक महिन्यापासून चालू असल्याचे, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचलनालयाकडून सांगितले जाते.

( हेही वाचा : मलेशियाच्या धर्तीवर कमला नेहरु पार्कमध्ये ‘ट्री वॉक’ )

मुख्यमंत्र्यांना निवेदन

पण प्रत्यक्षात मात्र शासनाची याबाबत फक्त उदासीनता दिसून येते. सार्वजनिक आरोग्य विभागाने पदभरती करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यासही पेपरफुटीचे गालबोट लागले. या सर्व बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की, परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांची १००% पदभरती तातडीने व राज्यात ओमायक्रॉनच्या संक्रमनाचा प्रादुर्भाव वाढण्याआधी करण्यात यावी. तसेच इतर अडचणी व मागण्यांबाबत गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने सोडवण्यात याव्यात. अन्यथा राज्यातील परिचारिकांना लवकरच तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अशी माहिती संघटनेच्या राज्याध्यक्ष मनीषा शिंदे, राज्यसरचिटणीस सुमित्रा तोटे, राज्यकार्याध्यक्ष अरुण कदम, राज्य उपाध्यक्ष मंगला ठाकरे, भिमराव चक्रे, शाहजाद बाबा खान, हेमलता गजबे, राज्य खजिनदार राम सुर्यवंशी, सहसचिव अजित वसावे, सदस्य पांडुरंग गव्हाणे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.