गेली आठवडाभर आझाद मैदानात आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी झटणा-या सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी बुधवारी दुपारी बेमुदत आंदोलन मागे घेतले. आम्ही दुपारीच कामावर रुजू होत असल्याची माहिती परिचारिकांनी दिली.
( हेही वाचा : एसटी महामंडळाच्या ‘शिवाई’ला अजित पवारांचा हिरवा कंदील; सर्व बसेसचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्नशील )
शुक्रवारपासून परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स, विभागप्रमुख परिचारिका विद्यार्थ्यांच्या मदतीने रुग्णसेवेचा भार सांभाळत होते. काम बंद आंदोलनाच्या काळात ज्या सरकारी रुग्णालयांतील परिचारिका संपात सहभागी झालेल्या तिथे केवळ आपात्तकालीन शस्त्रक्रिया पार पाडल्या गेल्या तर दीर्घकाळ रुग्णसेवा द्यावी लागणा-या रुग्णांना दाखल करताना रुग्णालय प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात होती.
सर्व मागण्यांबाबत १५ जुलैपर्यंत पूर्तता केली जाईल
संपकाळाच्या सुरुवातीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख लातूरमध्ये होते. त्यामुळे मंत्रालयातील बैठकीसाठी मंगळवारचा दिवस उजाडला. प्रशासकीय बदल्या, कंत्राटीपद्धतीने परिचारिकांच्या नेमणूका रद्द करणे या दोन प्रमुख मुद्द्यांसह इतर अन्य मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची देशमुख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्न विभागातील अधिका-यांशी बैठक झाली. या बैठकीत परिचारिकांच्या सर्व मागण्यांबाबत १५ जुलैपर्यंत पूर्तता केली जाईल, असे लेखी आश्वासन बुधवारी मिळाल्यानंतरच परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले. परिचारिकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांची नियुक्ती केली. लिखित आश्वासनात मान्य झालेल्या मागण्या जुलैपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या सरचिटणीस सुमित्रा तोटे यांनी दिला.
Join Our WhatsApp Community