दादर-धारावी नाल्यावर जुना पूल तोडून नवीन तात्पुरता पूल उभारण्याचे काम अवघ्या १७ दिवसांत पूर्ण

134

दादर – धारावी नाल्याच्या बंदिस्त प्रवाहावर असलेला आणि माहिम उपनगरीय रेल्वे स्थानक व धारावी या परिसरांना जोडणारा पूल मोडकळीस आल्याने तो नव्याने बांधण्यात येणार आहे. तत्पूर्वी या परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी म्हणून या ठिकाणी जुना पूल तोडून त्यानंतर तब्बल ३० टन वजनाचा तात्पुरता पूल उभारण्याचे विक्रमी काम अवघ्या १७ दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहे. हा तात्पुरता पूल बुधवारी १ जून २०२२ पासून वजनाने हलक्या वाहनांसाठी खुला केला जाणार आहे.

( हेही वाचा : आरोग्य विभाग अर्लटवर, कोरोनाची रुग्णसंख्या सातशेपार)

दादर – धारावी नाल्यावर बंदिस्त प्रवाह मार्गावर (कल्व्हर्ट) २० मीटर लांब आणि १६ मीटर रुंदीचा पूल मोडकळीस आल्याने त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ह पूल माहिम स्थानक आणि धारावी या दोन्ही परिसरांना जोडणारा व अत्यंत वर्दळीचा आहे. पूल बंद करण्यात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांसह स्थानिक व्यावसायिकांना देखील वाहतुकीच्या अडचणी होऊ लागल्या होत्या.

तात्पुरता पूल उभारण्याचे काम अवघ्या १७ दिवसांत पूर्ण

तसेच अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनीही उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले व सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबतीने ११ मे २०२२ रोजी या ठिकाणी पाहणी केली. मोडकळीस आलेला सद्यस्थितीतील पूल तोडून त्या ठिकाणी तातडीने तात्पुरता पूल बांधावा आणि पावसाळा संपल्यानंतर नियमित पद्धतीने पूल बांधावा, असे निर्देश वेलरासू यांनी दिले होते.

हा परिसर अत्यंत वर्दळीचा व घनदाट वस्तीचा असल्याने जुना पूल तोडणे आणि तात्पुरता पूल बांधणे हे अत्यंत जिकरीचे होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून रात्रीच्या वेळी जुना पूल तोडण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार महानगरपालिकेच्या पूल खात्यामार्फत १३ मे २०२२ रोजी जुन्या पुलाचे पाडकाम सुरु करण्यात आले. अवघ्या ४ दिवसात म्हणजे १७ मे २०२२ रोजी पाडकाम पूर्ण झाले. दरम्यानच्या कालावधीत तात्पुरत्या पुलाचा आराखडा देखील सल्लागारामार्फत बनवून घेण्यात आला. पाडकाम पूर्ण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक १८ मे २०२२ रोजी तात्पुरता वाहतूक पूल उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. सुमारे ३० टन वजनाचा आणि १६ मीटर x ४ मीटर आकाराचा हा पूल उभारण्याचे काम अवघ्या १३ दिवसांत म्हणजे आज दिनांक ३१ मे २०२२ रोजी पूर्ण करण्यात आले. म्हणजेच जुना पूल तोडून नवीन तात्पुरता पूल उभारण्याची कार्यवाही विक्रमी अशा १७ दिवसांत पूल खात्यामार्फत पूर्ण करण्यात आली आहे.

हा तात्पुरता पूल बुधवारी १ जून २०२२ पासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यावरुन वजनाने हलक्या वाहनांना ये-जा करता येईल. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी पूल उभारण्याचे काम यंदाचा पावसाळा संपल्यानंतर लागलीच सुरु करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.