पालघर जिल्ह्यातील नायगाव येथील एका वृद्ध जोडप्याने फेसबुकच्या माध्यमातून हस्तिदंताने बनवलेल्या वस्तूंची विक्री सुरु केली होती. या जोडप्याच्या घरी वनाधिका-यांनी बनावट ग्राहक बनून धाड टाकली. मात्र धाडीत पकडलेले हस्तिदंत खरे आहे की नाही, याबाबतचा प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच कारवाईबाबत निश्तितता येईल, अशी माहिती डहाणू वनविभाग (प्रादेशिक)च्या उपवनसंरक्षक मधुमिता यांनी दिली. ९ ऑक्टोबर रोजी ही धाड टाकण्यात आली. यंदाच्या वर्षातील मुंबई महानगर प्रदेशातील हस्तिदंतावरील ही दुसरी कारवाई आहे.
वनाधिका-यांनी कमालीची गुप्तता पाळली
वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा तसेच राज्य वनविभागाने मिळून ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या अधिका-यांना या वृद्ध इसमाबाबत माहिती मिळाली. हा वृद्ध आपल्या पत्नीसोबत नायगाव येथील घरातच दुर्मिळ वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करत होता. फेसबूकवर वेगवेगळ्या वस्तूंची छायाचित्रे पोस्ट करत तो विक्रेत्यांशी संपर्क साधायचा. ऑनलाईन माध्यमातूनच वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेला या वृद्धाबाबत माहिती मिळाली. शाखेचे काही अधिकारी अशा दुर्मिळ वस्तू खरेदी करण्यासाठी वृद्ध इसमाच्या घरी गेल्यानंतर त्यांच्यासमोर हस्तिदंतावर केलेल्या कोरीव कामाच्या वस्तू ठेवण्यात आल्या. अखेरीस वनाधिका-यांनी जोडप्याला रंगेहाथ पकडल्यानंतर चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र या हस्तिदंताची विक्री अवैध असल्याची कल्पना आपल्याला नसल्याची माहिती वनधिका-यांना वृद्ध इसमाने दिली. हस्तिदंत मुंबईतून आणले की नजीकच्या भागांतून याबाबत वनाधिका-यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. वृद्ध जोडप्याला अद्यापही अटक झालेली नाही.
(हेही वाचा गुजरातमधील झुलता पूल पडण्यामागे काय होते कारण?)
धाड टाकून वस्तू हस्तगत केल्या
दरम्यान, यंदाच्या वर्षांत खारघर येथूनही वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने तसेच पनवेल वनविभाग (प्रादेशिक)ने मिळून हस्तिदंतावर कोरीव काम केलेल्या वेगवेगळ्या वस्तू धाड टाकून हस्तगत केल्या. २५ मार्च रोजी ही कारवाई झाली होती. देवीच्या मूर्ती, बैल, वाघ या प्राण्यांच्या आकाराचे कोरीव काम हस्तिदंतावर केले होते. मात्र या कारवाईबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
Join Our WhatsApp Community