वृद्ध महिलेच्या ‘त्या’ छायाचित्रामागील सत्य समोर आल्याने भीती निवळली

लहान मुलांना पळवणारी टोळी शहरात फिरत असल्याच्या अफवेमुळे कल्याण डोंबिवलीतील पालक चिंतेत असताना त्यात भर म्हणून समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या एका छायाचित्रामुळे पालकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु या छायाचित्राची सत्यता बाहेर आली.

काय होते छायाचित्रात?

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या छायाचित्रात एक ५ ते ६ वर्षांची गोरीपान मुलगी एका ८० वर्षांच्या वृद्ध महिलेच्या पायशी झोपलेली होती आणि ही महिला त्या मुलीच्या नावाने येणाऱ्या जाणाऱ्याकडे भीक मागत होती. हा प्रकार होता डोंबिवलीच्या रेल्वे पुलावरचा. डोंबिवली पूर्वेकडे येणाऱ्या पुलावर ही महिला भीक मागत असताना एका रेल्वे प्रवासी महिलेने आपल्या मोबाईल फोनमध्ये या मुलीचा आणि वयोवृद्ध महिलेचा फोटो क्लिक केला आणि तो फोटो समाजमाध्यमावर व्हायरल केला. या छायाचित्रातील मुलगी आणि वयोवृद्ध महिलेमध्ये खूप फरक होता, मुलगी गोरीपान आणि सुंदर होती. महिला अगदी त्या विरुद्ध दिसत होती, हे छायाचित्र बघून कुणाच्याही मनात संशय येणारच आणि तो अनेकांच्या मनात आला. मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यापर्यंत हे छायाचित्रे आले व त्यांनी वेळीच हे छायाचित्र ट्विट करून रेल्वे पोलिसांना टॅग केले.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा धक्का, पक्षचिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच)

छायाचित्राची घेतली दखल आणि आले सत्य समोर

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या या छायाचित्राची दखल घेत डोंबिवली लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पुलावर भिक मागणाऱ्या या वयोवृद्ध महिला आणि तिच्यासोबत असणाऱ्या छायाचित्रात दिसणाऱ्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात आणले, या महिलेकडे या मुलींबाबत चौकशी केली असता ही माझी नात असल्याचे या महिलेने सांगितले. पोलिसांनी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्री करण्यासाठी या मुलीच्या आईशी संपर्क साधला असता ती खरोखर या महिलेची नातं असल्याचे समोर आले, पोलिसांनी या मुलींच्या आईला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले आणि तिच्याकडे चौकशी केली असता तिला जुळ्या मुली झाल्या आहेत, एक मुलगी तिच्यासोबत तर एक मुलगी आजी सोबत भीक मागते. पोलिसांनी सर्व प्रकारे खात्री केल्यानंतर ही मुलगी या महिलेची नातं असल्याचे समोर आले व पोलिसांनी आजीवर महाराष्ट्र भिक्षेकरी प्रतिबंधक अधिनियम १९५९ – ५,६, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ – ७६ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून मुलीची रवानगी बाल सुधारगृहात केली.

कोण आहे हे कुटुंब?

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी या खेड्यात राहणारे काळे कुटुंब पोट भरण्यासाठी मुंबईत आले. निल्या काळे (८२) आणि त्याची पत्नी नाशिका काळे (७२) असे वयोवृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. या दाम्पत्याच्या मुलीच्या ७ वर्षांच्या मुलीला घेऊन डोंबिवलीच्या रेल्वे पुलावर भीक मागत होती, तर या दाम्पत्याची मुलगी आणि जावई कल्याणमध्ये मजुरी करतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here