वेळासच्या कासवाला आता उपग्रहाच्या मदतीने गाठता येणार…

रत्नागिरी तालुक्यातील मंडणगड गावातील वेळासला आता देशभरात नव्हे तर जगभरात एक नवी ओळख मिळाली आहे. गेली कित्येक वर्ष वेळासच्या किनारपट्टीवर अंडी घालणा-या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाला आता उपग्रहाच्या माध्यमातून शोधता येणार आहे. गेली अनेक वर्ष या कासवांच्या घरट्याचे आणि अंड्याचे रक्षण करणा-या चिपळूणच्या सह्याद्री निसर्ग संवर्धन संस्थेच्या प्रयत्नांना ख-या अर्थाने यश मिळाले आहे. वनविभागाच्या कांदळवन कक्ष आणि देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेच्यावतीने एका ऑलिव्ह रिडले कासवाला पहिले उपग्रह टॅगिंग केले गेले.

उपग्रहीय निरीक्षण हा प्रमुख हेतू

ऑलिव्ह रिडले कासवांच्या सागरी स्थलांतरण मार्गांचे उपग्रहीय निरीक्षण हा प्रमुख हेतू ऑलिव्ह रिडले कासवाला उपग्रह टॅग करण्यामागे असल्याचे वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडून सांगण्यात आले. याआधी केवळ देशाच्या पूर्व किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांचे टॅगिंग केले जायचे. या अभ्यासातून ऑलिव्ह रिडले कासवांच्या पश्चिम किना-याजवळील सागरातील भ्रमणाबाबत माहिती मिळण्यास मदत होईल, अशी माहिती वनविभागाच्या कांदळवन कक्षाने दिली.

(हेही वाचा – …म्हणून आगारांत एका जागी उभ्या असलेल्या ‘लालपरी’ ठरतायंत डोकेदुखी!)

कसा उभा राहिला प्रकल्प

गेली वीस वर्ष वेळासवर अंडी घालणा-या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या अंड्यांचे सह्याद्री निसर्ग संवर्धन संस्थेच्यावतीने संवर्धन केले जात आहे. मात्र याबाबत संस्थेने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. कालांतराने येथे वनविभागाचे कांदळवन कक्ष आणि स्थानिकांच्या मदतीने कासव संवर्धन कार्यक्रम सुरु झाला. हळूहळू इथे निसर्ग पर्यटन उभारले गेले. मात्र किनारपट्टीवर विणीच्या हंगामात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान येणा-या ऑलिव्ह रिडले कासव नेमक्या कोणत्या भागातून ये-जा करतात, ही उस्तुकता उलगडली जात नव्हती. त्यातून उपग्रहाच्या माध्यमातून ऑलिव्ह रिडले कासवाला टॅग करायचे ठरले.

० राज्यातील आणि देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील उपग्रह टॅगिंग केलेल्या पहिल्या कासवाला प्रथम असे नाव दिले गेले. भारतीय वन्यजीव संस्थेच्या डॉ आर. राकेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले उपग्रह टॅगिंग यशस्वीरित्या पार पडले.
० या प्रकल्पांतर्गत पाच ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅग केले जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here