मे महिन्यात पुण्यात ओमायक्रॉन या कोरोनाच्या विषाणूच्या दोन उपप्रकाराचा संसर्ग झालेले सात रुग्ण सापडले. त्यानंतर आता पुन्हा नव्या रुग्णाला याचा संसर्ग झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पुण्यातील ३१ वर्षीय महिलेमध्ये बी.ए.५ हा कोरोनाचा व्हेरिएंट आढळून आल्याने पुण्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येसह ओमायक्रॉनच्या उपप्रकाराचाही फैलाव होत असल्याचे उघडकीस आले.
३१ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली होती. पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयात जनुकीय चाचणीत तिला बी.ए. ५ या विषाणूची बाधा झाल्याचा अहवाल समोर आला. बी.ए.५ बाधित महिला पूर्णपणे लक्षणेविरहित होती. रुग्णाला घरगुती विलगीकरणात उपचार दिल्यानंतर बरे केले गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. बी.ए.५ चा फौलाव वेगाने होत असल्याने पुण्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती.
(हेही वाचा आता विधान परिषदेसाठी नावांची ‘चर्चा’! शिवसेना, काँग्रेस आणि भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी)
८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
पुण्यात आज ८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ जणांना कोरोनाची बाधा झाली. पुण्यात सध्या ५६२ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. पुणे शहरात कोरोनाची लाट सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६ लाख ८१ हजार ७६१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. २८ मे रोजी पुण्यात ओमायक्रोनचे उपप्रकार असलेले बी.ए.४ व्हेरिएंटचे चार, तर बी.ए.५ तीन रुग्ण आढळले होते. या सर्व रुग्णांना कोविडची सौम्य लक्षणे होती. या सर्व रुग्णांना घरगुती विलगीकरणात उपचार दिले गेले. यात ९ वर्षांच्या मुलाचाही समावेश होता.
Join Our WhatsApp Community