कोरोना काळात बेस्ट कर्मचाऱ्यांनी समस्त मुंबईकरांना अविरत सेवा दिली. परंतु मुंबईकरांची बेस्ट हळूहळू खासगीकरणाच्या वाटेवर जात आहे, यामुळे कर्मचारी वर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीच्या वतीने २ मार्चला आंदोलन पुकारण्यात आले आहे. बेस्टमध्ये खासगी कंत्राटदारांच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे.
चलो वडाळा आगार
बेस्टमधील खासगीकरणाच्या विरोधात 2 मार्च रोजी कर्मचारी वडाळा डेपोमध्ये एकत्र येऊन आंदोलन करणार असल्याचे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले. कोविड कालावधीनंतर पहिल्यांदाच बेस्ट युनियनतर्फे मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येणार आहेत. प्रशासन आपल्याच लोकांची काळजी घेत नसल्याची तक्रार कर्मचारी वर्गाकडून करण्यात येत आहे. बेस्ट प्रशासन आपल्या बसेसची संख्या हळूहळू कमी करत आहे. बेस्ट प्रशासनाने ३ हजार ३३७ बसेसची संख्या कमी न करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु कृती समितीचे नेते राव यांच्या म्हणण्यानुसार त्यांची संख्या आता १ हजार ९०० वर आली आहे. याशिवाय भाडेतत्त्वावरील बसेसच्या दुरुस्ती व देखभालीसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे. असेही शशांक राव यांनी सांगितले. दरम्यान, बेस्ट उपक्रमाने सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे असे आवाहन कर्मचारी वर्गाला केले आहे.
( हेही वाचा : लसवंत नसलेल्यांना लोकल प्रवासासाठी उच्च न्यायालयाचा अल्टिमेटम! )
आंदोलनमागील नेमके कारण काय ?
२२ फेब्रुवारीला ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांचा ताफा सांताक्रूझ आगारात दाखल झाला. यामुळे कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. प्रतीक्षानगर आगारापाठोपाठ अजून ३ आगार तडकाफडकी बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासन घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यात प्रामुख्याने, ओशिवरा, मालवणी, सांताक्रूझ या आगारांचा समावेश होऊ शकतो. एकंदरीतच या अचानक लादलेल्या खाजगीकरणामुळे बेस्ट च्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. परिणामी, याच खासगीकरणाविरोधात बेस्ट संयुक्त काममगार कृति समितीच्या वतीने २ मार्चला आंदोलन पुकारण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community