मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने उघडीप घेताच मुंबई महापालिकेच्या वतीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे विविध भागात रस्ते बुजवण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली असून या कामाची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी उपायुक्त (पायाभूत सुविधा ) उल्हास महाले व रस्ते विभागाचे अधिकारी यांच्या समवेत करत आहेत. रविवारी सकाळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांनी दहिसर आणि बोरीवली येथील खड्डे बुजवण्याच्या कामांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती जाणून घेतली.
(हेही वाचा – अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवसापासून सुरू होणार ‘समृद्धी’ महामार्ग)
पालिका अधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पहाणी
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने खड्डे बुजवण्याचा कामांना गती देण्यात येत नव्हती. मात्र या खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिका आयुक्तांना आपापल्या विभागातील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाची माहिती जाणून घेताना रस्त्यांवरील खड्डे कोल्ड मिक्स तथा अन्य साहित्य वापरून त्वरित बुजवले जावेत आणि जनतेला दिलासा दिला जावा, अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. मात्र रविवारी पावसाने उघडीप घेतल्याने महापालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झाली आहे. हे खड्डे बुजवण्याचे काम कशाप्रकारे सुरू आहे याचा आढावा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु हे घेत आहेत.
या रस्त्यांवरील बुजवले खड्डे
अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु यांनी आर उत्तर विभागात, दहिसर (पूर्व) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर रामकुंवर ठाकूर जंक्शन येथे रस्त्यांवरील खड्डे बुजवलेल्या कामाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आर मध्य विभागात, बोरिवली (पश्चिम) मधील स्वामी विवेकानंद मार्गावर आर. एम. भट्टड जंक्शन येथे रस्त्यांवरील खड्डे बुजवलेल्या कामाचीही पाहणी केली.
आर दक्षिण विभागात, कांदिवलीलिंक रोड आणि महात्मा गांधी मार्ग जंक्शन येथे रस्त्यांवरील खड्डे बुजवलेल्या कामाची तसेच आर दक्षिण विभागात, कांदिवली (पश्चिम) मधील लालजीपाडा जंक्शन येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे सुपूर्द केलेल्या रस्त्याची सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी पाहणी केली.यावेळी उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) अशोक मेस्त्री, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर सहायक आयुक्त (प्रभारी) निवृत्त्ती गोंधळी, उपप्रमुख अभियंता (रस्ते) मनोज कामत
उपप्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) भाग्यवंत लाटे, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.