सनातन संस्थेच्या वतीने मुंबईसह देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ साजरा!

103

‘सुखस्य मूलं धर्मः।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनतो आणि गैरप्रकार करण्यापासून परावृत्त होतो. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ अर्थात् आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्‍या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी यावेळी केले.

सनातन संस्थेच्या वतीने दादर (पू.) येथील शारदा मंगल कार्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. मुंबईमध्ये दादरसह, जोगेश्वरी, घाटकोपर आणि मुलुंड या ठिकाणी, नवी मुंबईमध्ये सानपाडा व ऐरोली येथे, पालघर जिल्ह्यात वसई येथे तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतही ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. तसेच सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

सध्याच्या भ्रष्ट राजतंत्र बदलायला हवे – भार्गव बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्म टिकवायचा असेल तर आपली संस्कृती आणि वेदांचा अभ्यास करायला हवा. आपली संस्कृतीच आपल्याला बलवान बनवू शकते. ईश्वराशी सातत्याने अनुसंधान ठेवून कार्य करायला हवे. सध्याचे राजतंत्र भ्रष्ट झाले आहे. या भ्रष्ट राजतंत्रला बदलायला हवे. सर्व हिंदूंनी भारतीय म्हणून एकत्र दुष्प्रवृत्तींविरोधात येऊन प्रतिकार केला पाहिजे आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी पुढे यायला हवे असे आवाहन वसई (मेधे) येथील श्री परशुराम तपोवन आश्रमाचे संचालक भार्गव बी.पी. सचिनवाला यांनी वसई (प) येथील विश्वकर्मा सभागृह येथे आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात केले.

(हेही वाचा मॉलमध्ये लव्ह जिहाद? अशा प्रकारे हिंदू मुलींना केलं जातेय ‘टार्गेट’)

ग्रंथ प्रकाशन झाले

गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. देशभरात अन्य ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या मराठी आणि हिंदी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे’, मराठी भाषेतील ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’, तसेच इंग्रजी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेज् स्पिरिच्युअल वर्कशॉप्स इन 1992’, ‘सिकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’, ‘एफर्टस् ॲट द स्पिरिच्युअल लेवल फॉर रिमूव्हल ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्टस्’ आणि ‘हाऊ टू प्रोग्रेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा?’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली. तर काही ठिकाणी ‘प्रात्यक्षिकांचा लघुपट दाखवण्यात आला.’ मुंबई, नवी मुंबईसह विविध ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमांना समाजातील मान्यवर वक्त्यांनी संबोधित केले. या कार्यक्रमांचा समाजातील सहस्रो जिज्ञासू, धर्मप्रेमी यांनी लाभ घेतला.

9 भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव

यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलुगु, गुजराती, बंगाली, ओडिया या 9 भाषांत ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील हजारो भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ गुरु’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.