पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तसेच कार्यालयात काही अनुचित घटना घडतात किंवा दुर्घटना घडतात. तेव्हा त्यात मृत्यू होतो आणि त्याचा परिणाम म्हणून मृतात्म्यांपासून त्रास होऊ लागतो, अशी पोलिसांमध्ये धारणा निर्माण झाल्याने हा त्रास बंद व्हावा, म्हणून मुंबई पोलिसांमध्ये चक्क आषाढी आमावस्येला बळी देण्याची प्रथा सुरु आहे. ही कुप्रथा बंद करण्यात यावी, असे परिपत्रक मुंबई पोलीस प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांमध्ये आता या परिपत्रकावरून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काय म्हणतात पोलीस कर्मचारी?
मुंबई पोलीस मुख्यालयातून काढण्यात आलेल्या या परिपत्रकामुळे मुंबईतील पोलीस ठाण्यातील अधिकारी वर्गात नाराजी पसरली आहे.आषाढी आमावस्येला अर्थात गटारी अमावस्येला पोलीस ठाण्यात या प्रकारे कुठल्याही प्रकारचा बळी देऊन गटारी साजरी करण्यात येत नाही. पोलीस प्रशासनाच्या परिपत्रकात ‘पोलीस मृतात्म्यांना शांती लाभावी यासाठी कोंबड्या आणि बकऱ्यांचे बळी देत आहेत, असे जे म्हटले आहे ते साफ चुकीचे आहे’, असे अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे म्हणणे आहे. गटारीच्या दिवशी सर्व पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी असतात. पोलीस कायम बंदोबस्तामध्ये व्यस्त असतात, त्यांना सण-उत्सव आपल्या कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. म्हणून गटारी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक पोलीस ठाण्यात सर्वांसाठी बाहेरून जेवण मागवून आम्ही एकत्र जेवतो, त्यात मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाचाही समावेश असतो. पोलीस ठाण्यात गटारी वगैरे साजरी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जसे आम्ही गटारी साजरी करतो, तसे गुढीपाडवा, दसरा असे गोडाधोडाचेही सण साजरे करतो, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
काय आहे कुप्रथा?
श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या आषाढी अमावस्येच्या दिवशी गटारी साजरी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे या अमावस्येला गटारी अमावस्या असे प्रचलित नाव देण्यात आले. गटारी अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी कोंबड्या, बकऱ्यांची कत्तल करण्यात येते. मुंबईसह राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तसेच शाखा, कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गटारी अमावस्येच्या दिवशी कोंबड्या, बकऱ्यांचे बळी देऊन त्याचे जेवण तयार करून ‘प्रसाद’ म्हणून कर्मचारी यांना वाटण्यात येते.
काय म्हटले आहे पोलिसांच्या परिपत्रकात?
पोलीस प्रशासनाने यासंबंधी परिपत्रक काढले आहे. त्यात पोलीस जर अंधश्रद्धेपोटी बळी देण्याची कुप्रथा पाळत असतील आणि सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करत असतील, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या बळीचा प्रथेविरोधात कडक पाऊल उचलले आहे. ‘पोलीस दल हे समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असल्याने पोलिसांनी स्वतः कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. अशा अंधश्रद्धेपोटी सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल केली जात असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पोलीस प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community