मृतात्म्यांपासून रक्षण होण्यासाठी पोलीस ठाण्यात बळीची प्रथा! पोलीस प्रशासन करणार कारवाई  

पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तसेच कार्यालयात काही अनुचित घटना घडतात किंवा दुर्घटना घडतात. तेव्हा त्यात मृत्यू होतो आणि त्याचा परिणाम म्हणून मृतात्म्यांपासून त्रास होऊ लागतो, अशी पोलिसांमध्ये धारणा निर्माण झाल्याने हा त्रास बंद व्हावा, म्हणून मुंबई पोलिसांमध्ये चक्क आषाढी आमावस्येला बळी देण्याची प्रथा सुरु आहे. या प्रकारामुळे मात्र सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु आता ही प्रथा बंद करण्यात यावी, याकरता मुंबई पोलीस प्रशासनाला या कुप्रथेच्या विरोधात थेट परिपत्रकच काढावे लागले आहे. मुंबई पोलीस अशाप्रकारे अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.

काय आहे कुप्रथा? 

पोलीस जर अंधश्रद्धेपोटी बळी देण्याची कुप्रथा पाळत असतील आणि सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल करत असतील, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणाऱ्या आषाढी अमावस्येच्या दिवशी गटारी साजरी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे या अमावस्येला गटारी अमावस्या असे प्रचलित नाव देण्यात आले. गटारी अमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी कोंबड्या, बकऱ्यांची कत्तल करण्यात येते. मुंबईसह राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तसेच शाखा, कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गटारी अमावस्येच्या दिवशी कोंबड्या, बकऱ्यांचे बळी देऊन त्याचे जेवण तयार करून ‘प्रसाद’ म्हणून कर्मचारी यांना वाटण्यात येते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या बळीचा प्रथेविरोधात कडक पाऊल उचलले आहे. ‘पोलीस दल हे समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असल्याने पोलिसांनी स्वतः कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. अशा अंधश्रद्धेपोटी सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची कत्तल केली जात असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे पोलीस प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here