कोरोनामुळे थंडावलेल्या गृहनिर्माण उद्योगाला हळूहळू चालना मिळत असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यभरात तब्बल ६ हजार कोटींची गृहविक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात मुंबई अव्वल स्थानी असून, ठाणे आणि नवी मुंबईच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.
(हेही वाचा – घाबरू नका..! सत्तेच्या खुर्चीवर मी बसणार नाही, तुम्हालाच बसवेन; राज ठाकरेंची कोपरखळी)
एकट्या मुंबईत गृह विक्रीतील उलाढाल दीड हजार कोटींवर नोंदवली गेली. त्या खालोखाल पुणे १ हजार कोटी आणि ठाण्यात ६०० कोटींची घरे विकली गेली. कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे या मेट्रो शहरांमध्ये उलाढाल वाढलेली दिसून येत आहे. ठाणे महापालिका हद्दीत तब्बल ४९५ नवीन घरांची नोंदणी झाली आहे. नवीन ठाणे म्हणून ओळख निर्माण झालेल्या घोडबंदर रोडवरील सदनिकांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. यातून सुमारे ६०० कोटींची उलाढाल ही गृह उद्योगामध्ये झाली असून ठाण्यात अजून एक हजार घरे विक्रीसाठी तयार आहेत.
कोरोना पश्चात तेजी
– कोरोना निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे बांधकाम व्यवसायाला मोठा फटका बसलेला होता. त्यात महागाई वाढल्याने घरांच्या किमतीही वाढू लागल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी गृह खरेदीकडे पाठ फिरवल्याने दिसून येत होते.
– मात्र, दसऱ्याचा मुहूर्त साधत विकासकांनी अनेक योजना राबवत ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. स्टॅम्प ड्युटी माफ, घर ताब्यात घेतल्यानंतर रक्कम भरा तसेच किमतीही कमी करीत सवलतींचा वर्षाव केला.
– त्यात मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने ग्राहकांनी ठाण्यात घर खरेदीला पसंती दिली.
कोणत्या शहरात किती विक्री?
• मुंबई – दीड हजार कोटी
• पुणे १ हजार कोटी
• नाशिक – ६०० कोटी
• ठाणे – ६०० कोटी
• कोल्हापूर ५०० कोटी
• औरंगाबाद – ४०० कोटी