स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात २४ मे ते २६ मे दरम्यान विविध चित्र प्रदर्शन, रक्तदान शिबीर आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २ रुपयांच्या २२ हजार २२२ नाण्यांच्या साहाय्याने १२ बाय १३ फूट छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. या भव्य प्रतिमेचे अनावरण शनिवार, २५ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या हस्ते फित कापून अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी या प्रतिमेसाठी नाण्यांचे संकलन केलेले प्रसिद्ध छायाचित्रकार रंजन गावडे आणि या नाण्यांच्या साहाय्याने ही भव्य प्रतिमा निर्माण करणारे प्रसिद्ध चित्रकार सागर पाटणकर यांच्यासह शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार उपस्थित होते. नागरिकांना ही भव्य प्रतिमा शनिवारपासून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात विनामूल्य पाहता येणार आहे.
अशी साकारली भव्य प्रतिमा
प्रसिद्ध छायाचित्रकार रंजन गावडे हे अनेक वर्षांपासून २ रुपयांच्या नाण्यांचे संकलन करत आहेत. महाराष्ट्रासह कोलकाता, मध्य प्रदेश, गुजरात येथून ही नाणी संकलित केली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या जयंतीनिमित्ताने ही जमवलेली नाणी सार्थकी लागावीत म्हणून रंजन गावडे यांनी या नाण्यांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रसिद्ध चित्रकार सागर पाटणकर यांनी १२ बाय १३ फुटाची महाराजांची प्रतिमा रेखाटली असून त्यावर या नाण्यांची सुरेख सजावट केली. या भव्य प्रतिमेचे शनिवार, २५ मे रोजी अनावरण झाले.
Join Our WhatsApp Community