हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे खरे रत्नपारखी होते. त्यांच्या खजिन्यात मुरारबाजींसारखी नररत्ने होती. इ.स.1656 मध्ये जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचे पारिपत्य करताना महाराजांना मुरारबाजी देशपांडे हा हिरा गवसला. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजींचे मूळ गाव. जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरुद्ध तिखट तलवार चालवली. एक पाऊलही पुढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींचे कर्तृत्व ओळखले आणि गोड शब्दात समजूत काढून स्वराज्यात सामील करून घेतले.
दिलेरखानाला कडवी झुंज दिली
मोगलांनी पुरंदर किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात मराठा सैन्याचे नेतृत्व करत मुरारबाजींनी कणखर झुंज दिली, मात्र 16 मे 1665 रोजी मोगलांच्या सुलतानढव्याचा प्रतिकार करताना मुरारबाजींना वीरमरण प्राप्त झाले. मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी इ.स.1665 च्या आषाढात पुरंदरला वेढा घातला. संतप्त दिलेरखान पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा करून अहोरात्र पुरंदरला धडका देत होता. दिलेरखान हा मुरब्बी सेनानी होता. पुरंदरचे अभेद्यपण त्याच्या लक्षात आले होते. पुरंदर सर करायचा असेल तर आधी वज्रगड ताब्यात घेणे आवश्यक आहे, हे त्याने ओळखले. वज्रगडचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभू आणि त्यांचे बंधू बाबाजी बुवाजी प्रभू यांनी अवघ्या तीनशे मावळ्यांसोबत दिलेरखानाला निकराची झुंज देऊन पंधरा दिवस वज्रगड झुंजवला. पण दिलेरखानाच्या तोफांच्या माऱ्यापुढे गडाचा वायव्य बुरुज ढासळला आणि गड पडला. आता वेळ पुरंदरची होती, पण मुरारबाजी तडफेने किल्ला लढवत होते.
(हेही वाचा तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा खाली आणणार, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा )
अवघे सातशे मावळे घेऊन दिलेरखानावर तुटून पडले
16 मे 1665 रोजी मुरारबाजींच्या मनात एक धाडसी विचार आला. गडावरून सातशे मावळे घेऊन उत्तरेच्या बाजूने अचानक दिलेरखानावर तुटुन पडायचं असा हा विचार होता. हिंदवी स्वराज्यात मावळ्यांनी असा भीमपराक्रम या आधीही गाजवला होता. स्वतः शिवाजी महाराजांनी केवळ चारशे कडवे मावळे घेऊन शाहिस्तेखानाला पळता भुई थोडी केली होती. मुरारबाजींनी असा अविचार करण्याचे कारणही होते, एका वर्षापूर्वी सिंहगडावर मोर्चे लावून बसलेल्या जसवंतसिंह या मुघल राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदाराने अवघ्या काहीशे मावळ्यांना घेऊन असाच भयंकर धाडसी हल्ला चढवला होता आणि तो पूर्ण यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंह पळून गेला होता. असेच होते वेडात दौडणारे वीर मराठी मावळे. स्वराज्यापुढे प्राणांची किंमत होती कुणाला? नाहीतरी पुरंदर शेवटच्या घटका मोजतोय, प्रयत्न यशस्वी झाला तर इतिहास घडेल, असा उदात्त विचार करून मुरारबाजींनी दिलेरखानाच्या रोखाने गडावरून खाली झेप घेतली . या घटनेनंतर मुरारबाजींचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले!
शौर्य पाहून दिलेरखानही खूश झाला
भयंकर कल्लोळ उडाला, मुरारबाजींचे शौर्यतांडव पाहून दिलेरखान स्तिमित झाला. मुरारबाजींच्या शौर्यावर खूश झाला. त्याने स्वतः हुकुम देऊन मुरारबाजींवरील हल्ला थांबवला. दिलेरखान निथळत्या मुरारबाजींसमोर येऊन म्हणाला, ” अय बहाद्दूर , तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुआ हूँ | तुम हमारे साथ चलो , हम तुम्हारी शान रखेंगे ! ” हे उद्गार ऐकून मुरारबाजी संतापले. संतप्त स्वरात त्यांनी जबाब दिला, “मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय?” आणि मुरारबाजी दिलेरखानावरच तुटून पडले. मुरारबाजी आता आपल्याशीच लढायला येत आहेत, हे पाहून दिलेरखानाने धनुष्यबाण हातात घेतला. प्रत्यंचा कानापर्यंत खेचून मुरारबाजींच्या कंठाचा वेध घेतला आणि मुरारबाजींना वीरगती मिळाली. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले. हेच महाराष्ट्र धर्माचे तेज. मुरारबाजींनी दिलेल्या रोमहर्षक लढ्याचे सभासद बखरीत रोमंचक वर्णन करण्यात आले आहे.
सात हजार पठाणांना भारी पडला
“सात हजार पठाण आणि मूठभर मावळे, पण पहिल्या हल्ल्यातच पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. खासा मुरारबाजी परभू माणसांनिशी मारीत शिरला, तेंव्हा दिलेरखान बोलिला, “अरे तू कौल घे, मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो’ त्यावर मुरारबाजी बोलले, ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजीराजाचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय? ‘ असे म्हणत तो खानावर चालुनी गेला. हातघाईचे युद्ध जाहले. तोच खानाने आपले आगे कमाण घेऊन तीर मारून काम पुरा केला. मग तोंडात अंगोळी घालत म्हणाला, ‘ असा शिपाई खुदाने पैदा केला ! ‘ मुरारबाजी बरोबर तीनशे माणूस ठार जाहले.” हिंदवी स्वराज्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या ह्या मर्द मराठ्यास त्रिवार मानाचा मुजरा!
(हेही वाचा गर्दी खेचणारा असली कोण आणि नकली कोण? राज-उद्धव यांच्या सभांची तुलना सुरू)
Join Our WhatsApp Community