आजच्या दिवशी जागतिक वन दिन साजरा केला जातो. या निमित्ताने वनांचे संवर्धन करण्याचा संदेश दिला जातो. पण, याच दिवशी मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जंगलक्षेत्राला भीषण आग लागली आहे. जंगलाला लागलेल्या या भीषण आगीत वन औषधींसह पक्षीही जळून खाक झाले आहेत. अभयारण्य असणाऱ्या किनवट-माहूर, इस्लापूर जंगल क्षेत्रात गेल्या महिन्याभरात पाच वेळा भीषण आग लागली आहे. तीन ते चार दिवस जंगलात आग धुमसत आहे. मोहफुले, तेंदूपत्ता, लाकडासाठी जंगल पेटवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
उन्हाळा सुरु होताच वणवा
मराठवाड्यातील सर्वात मोठे जंगल क्षेत्र म्हणजे जवळपास 67 हजार हेक्टर असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात जागतिक वन दिनीच किनवट येथील अंबाडी वन क्षेत्राला भीषण आग लागली. या जंगल क्षेत्रात वाघ, अस्वल, लांडगा, कोल्हे, नीलगाय, हरीण, काळवीट, बिबट्या असे अनेक वन्यजीव आहेत. तर आयुर्वेदिक वसनस्पती, टेंभी पत्ता, मध, डिंक, लाकूड, मोहफुले हा वन मेवाही मोठ्या प्रमाणात आढळतो. पण या अनेक औषधी वनस्पतींची खाण असणाऱ्या अभयारण्यात उन्हाळा सुरु होताच हा वणवा धगधगू लागला आहे.
( हेही वाचा :चहासाठी रसायनयुक्त गुळाचाच वापर,’अशी’ होतेय ग्राहकांची फसवणूक! )
जाळ प्रतिबंधक रेषेचा खर्च वाया
सध्या उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला आहे. त्यातच जंगलातील वनवा पेटू लागला आहे. दरम्यान वनविभागाकडून मोठा खर्च करुन प्रतिबंधक रेषा (जाळरेषा) काढूनही, जंगल पेटू लागल्यानं प्रतिबंधक रेषेवर केलेला खर्च वाया गेला आहे. जंगलात वणवा लागू नये, म्हणून जाळ प्रतिबंधक रेषा मजूर लावून आखली जाते. पण आणखी दोन महिन्यांच्या वर उन्हाळा बाकी असताना, जंगलात वारंवार वणवा पेटून, जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. जंगलाच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे या आगी लागण्याचे प्रमाण जास्त असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Join Our WhatsApp Community