पुन्हा एकदा झोपड्या कोविड प्रतिबंधकतेच्या मार्गावर

129

कोविड काळात झोपडपट्यांमध्ये कोविड प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक शौचालयांमध्ये औषधाची फवारणी करण्यात येत होती, परंतु पुन्हा एकदा वाढत्या कोविड रुग्णांची संख्या पाहता सर्व झोपडपट्टी परिसरांमध्ये नियमितपणे संसर्ग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी. विशेषतः झोपडपट्टयांमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये, शौचालयांमध्ये दिवसातून किमान ५ वेळा जंतुनाशक औषध फवारणी झालीच पाहिजे,असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. जेणेकरुन, कोविडसह पावसाळी आजारांचा फैलाव रोखता येईल. या उपाययोजनांसाठी अधिकचा निधी आवश्यक असल्यास तो उपलब्ध करुन दिला जाईल.

दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक

मुंबईतील कोविड-१९ विषाणू बाधितांच्या संख्येत मागील आठवडाभरात वेगाने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी ३ जून २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाने बैठक घेतली.

मुंबई महानगरात सध्या होत असलेली कोविड चाचण्यांची प्रतिदिन संख्या ८ हजार इतकी असून ती प्रतिदिन ३० ते ४० हजार पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. कारण सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून हा दर सावधानतेचा इशारा देणारा आहे. चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल, परिणामी संसर्गाला अटकाव करता येईल. सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी जिथे जिथे कोविड बाधित आढळतील, तिथे चाचण्यांची संख्या तातडीने वाढवावी. संबंधित बाधित रुग्णांचा संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करावी.

( हेही वाचा : Central Railway: मुंबई-मडगाव सुपरफास्ट एकेरी विशेष ट्रेन धावणार )

ज्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये बाधित आढळतील, त्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये सर्व रहिवाशांची सामूहिक कोविड चाचणी करावी. तसेच त्या इमारती / गृहनिर्माण संस्था लवकरात लवकर संसर्गमुक्त होतील, यावर लक्ष केंद्रीत करावे.

सर्व भव्य कोविड रुग्णालयांना (जम्बो कोविड सेंटर) सतर्क राहण्याची सूचना करण्यात येत असून रुग्ण दाखल करुन घेता येईल, अशारितीने सुसज्ज यंत्रणा, वैद्यकीय मनुष्यबळ व इतर कर्मचारी नेमण्यात यावेत. विशेषतः अतिदक्षता उपचारांच्या रुग्णशय्या आणि त्यासाठी लागणारी वैद्यकीय संयंत्रे उपलब्ध ठेवावीत. जेणेकरुन रुग्णसंख्या वाढली तर, अडचण होऊ नये.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.