मुंबईत मागील अनेक महिन्यांपासून जागतिक स्तरावर दखल घेतलेल्या धारावीने शुन्याची किमया साधली असली तरी वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुन्हा एकदा धारावीने रुग्ण संख्येचे शतक पार केलेले आहे. गुरुवारी तब्बल १०७ कोविड बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जी आजवरची सर्वोच्च रुग्ण संख्या मानली जात आहे.
मुंबईत रुग्णांची संख्या वाढत असून याचा परिणाम प्रत्येक विभागांमध्ये दिसून येत आहे. धारावी, माहिम व दादर या जी उत्तर विभागांमध्येही जिथे एक अंकी रुग्ण संख्या आढळून येत होती, तिथे आता सहाशेचा पल्ला गाठल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभरात ६३८ रुग्ण आढळून आले. यामध्ये धारावीमध्ये १०७ नवीन रुग्ण, तर दादरमध्ये २२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर माहिममध्ये ३०८ नवीन रुग्णांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून दादर व माहिममध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना धारावीमध्ये बऱ्यापैकी बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. परंतु आता धारावीनेही शंभरी पार केल्याने आता धारावीतील वाढती रुग्ण संख्या चर्चेचा आणि प्रशासनाच्या डोकेदुखीचा विषय ठरणार आहे.
( हेही वाचा : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबाबत डॉक्टरांचे काय आहे म्हणणे…प्रशासनाची काय आहे हतबलता )
धारावीतील तिन्ही लाटेमध्ये आढळून येणारे रुग्ण
पहिली लाट ३ मे २०२०
आढळून आलेले रुग्ण : ९४
चाचणींची संख्या : ४५५
पॉझिटिव्ह दर : ५ टक्के
दुसरी लाट ८ एप्रिल २०२१
आढळून आलेले रुग्ण : ९९
चाचणींची संख्या : १,५५८
पॉझिटिव्ह दर :१८.९ टक्के
तिसरी लाट ६ मे २०२२
आढळून आलेले रुग्ण : १०७
चाचणींची संख्या : १,११५
पॉझिटिव्ह दर : २१ टक्के