दुचाकी पार्क करताना झालेल्या वादातून ५ ते ६ जणांनी मिळून दुचाकीस्वारासह तिघांना केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यु झाला असून दोघे जण जखमी झाले आहे. ही घटना घाटकोपर पश्चिमेतील असल्फा व्हिलेज येथे गुरुवारी पहाटे घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी दाखल झालेल्या घाटकोपर पोलिसांनी तात्काळ मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध हत्या, दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल
गणेश शिंदे (२५) असे मारहाणीत मृत्यु झालेल्याचे नाव असून अमर शिंदे आणि नागेश कोकाटे हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे. गणेश शिंदे हा घाटकोपर पश्चिम असल्फा व्हिलेज येथील जय महाराष्ट्र चाळ या ठिकाणी राहत होता. गणेश शिंदे हा बुधवारी रात्री त्याची मोटारसायकल पार्क करीत असताना मोटारसायकलचा धक्का विनोद सिंग याला लागला, विनोद सिंग आणि मनजीत सिंग हे दोघे गणेश शिंदे सोबत वाद घालू लागले, या वादातून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली तेव्हाच मनजीतने घरातून हत्यार आणले आणि आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलवून घेतले. त्याच दरम्यान अमर शिंदे आणि नागेश कोकाटे हे मध्यस्थी करण्यासाठी आले असता मनजीत सिंग, विनोद सिंग व त्यांच्या इतर साथीदारांनी या तिघांना मारहाण करण्यास सुरुवात केली, मनजीत सिंग याने सोबत आणलेल्या शस्त्राने गणेशच्या गळ्यावर वार करून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली.
( हेही वाचा : येत्या रविवारी भाजपच्या १५० एसटी बसेस कोकणाच्या रस्त्यावर)
या मारहाणीत गणेश शिंदे हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपीनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी गणेश शिंदे याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी जमाव गोळा झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्या आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community